मुंबई - एकीकडे बेस्ट उपक्रमातील स्वच्छता करणारे कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने बस स्थानके (डेपो) आणि ग्राहक सेवा विभागात अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे बस स्थानके आणि ग्राहक सेवा विभागाचा आवारातील स्वच्छता राखण्यासाठी एका वर्षासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी बेस्ट उपक्रम ५२ लाख रुपये खर्च करणार आहे.
बेस्ट उपक्रमाचा दादर व वडाळा येथील ग्राहक सेवा विभाग तसेच कुर्ला पूर्व, सांताक्रूझ पूर्व, आगरकर चौक, अंधेरी पश्चिम, शिवाजी नगर या बस स्थानकांच्या आवारात स्वच्छता राखणे, फरशी फुसणे, कचरा काढणे हि कामे कंत्राटदाराकडून करून घेतली जाणार आहेत. त्यासाठी उपक्रमाने निविदा काढल्या असता डी. एम. इंटरप्राइझेस, सुपर सर्व्हिस पॉईंट, स्पार्कल फॅसिलिटी सर्व्हिस प्रा. लि. या तिघांनी प्रतिसाद दिला. यामध्ये डी. एम. इंटरप्राइझेसचे दर सर्वात कमी असल्याने त्यांना स्वच्छता राखण्याचे कंत्राट दिले जाणार आहे. निविदेनुसार दादर व वडाळा येथील ग्राहक सेवा विभाग स्वच्छ ठेवण्यासाठी १५ महिला व पुरुष तसेच कुर्ला पूर्व, सांताक्रूझ पूर्व, आगरकर चौक, अंधेरी पश्चिम, शिवाजी नगर बस स्थानकांच्या स्वच्छतेसाठी १० असे एकूण २५ कंत्राटी कामगार व एक पर्यवेक्षक अशा २५ जणांची नियुक्ती केली जाणार आहे. कंत्राटदाराने बीएसएनएल, अहुजा प्रॉपर्टीज, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंशुरन्स इत्यादी संस्थेमध्ये हाऊसकिपींगचे काम केले आहे. बेस्टचा एक सफाई कामगार किंवा नवघाणी कामगार यांचा वर्षाचा पगार ३ लाख ८१ हजार ३१५ रुपये इतका आहे. कंत्राटदाराला वर्षाला २५ कामगारांसाठी ५२ लाख ५८ हजार ५४५ रुपये इतकी रक्कम अदा केली जाणार आहे. ही रक्कम बेस्टच्या १३ ते १४ सफाई कामगार किंवा नवघाणी कामगार यांच्या समकक्ष असल्याने त्याला बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे.
No comments:
Post a Comment