नवी दिल्ली - हिरे व्यापारी नीरव मोदी आणि राहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेला गंडवल्याचे प्रकरण उघडकीस येण्याच्या आधी देशातील विविध बँकांमध्ये गेल्या तीन वर्षांत तब्बल 62 हजार कोटींहून अधिक रुपयांचे घोटाळे झाल्याचे भारतीय रिझव्र्ह बँकेने माहिती अधिकारात दिलेल्या तपशीलातून उघडकीस आले आहे.
घोटाळे झालेल्या 74 राष्ट्रीय आणि खासगी बँकाची यादी रिझव्र्ह बँकेने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना उपलब्ध केली. या बँकांमध्ये 2014-15, 2015-16 आणि 2017-18 या आर्थिक वर्षांतील ही प्रकरणे आहेत. यात सर्वाधिक घोटाळे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये झाले आहेत. या बँकेत गेल्या तीन वर्षांत 5 हजार 936 कोटींचे घोटाळे झाले आहेत. त्यानंतर पीएनबी बँकेचा क्रमांक लागतो. येथे 5 हजार 471 कोटींचे घोटाळे झाले. या काळात घोटाळ्यांची संख्या आणि अपहाराच्या रकमेतही मोठी वाढ झाली आहे. 2014-15 मध्ये 4 हजार 639 घोटाळे झाले. त्यानंतर 2016-17 मध्ये 5 हजार 78 घोटाळे झाले. म्हणजे घोटाळ्यांची संख्या 439 एवढी वाढली.
देशातील बँकामध्ये 2014-15 मध्ये 19 हजार 455 कोटी रुपयांचे घोटाळे झाले. तर 2016-17 मध्ये ही संख्या 5078 वर गेली आणि यात 23 हजार 934 कोटींचा फटका बसला. या यादीत एसबीआय, पीएनबीनंतर बँक ऑफ इंडियाचा क्रमांक लागतो. त्यानंतर बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा क्रमांक आहे. आयडीबीआय आणि अलाहाबाद बँकेचा देखील या यादीत समावेश आहे. अशा नऊ राष्ट्रीयकृत बँका आणि एक्सीस बँक या खासगी बँकेत घोटाळे झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. गेल्या तीन वर्षांत बँक ऑफ बडोदामध्ये 720 , एक्सीस बँकेत 636 आणि सिंडीकेट बँकेत 552 घोटाळे झाल्याचे समोर आले आहेत. हा तपशील बँकेचे माहिती अधिकारी एस.के. पाणिग्रही यांनी दिलेला आहे.