मुंबई - बीएसएनएलचे विभाजन करून बीएसएनएलला कुमकुवत करणारा टॉवर कंपनीचा निर्णय केंद्र सरकारने बिनशर्त मागे घ्यावा, यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सर्व कामगार संघटनांनी आझाद मैदानात गुरुवारी तीव्र निदर्शने केली. यावेळी नागेशकुमार नलावडे, रंजन दाणी, एम. एस. अडसूळ, आर. व्ही. शर्मा, यशवंत केकरे आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीएसएनएलच्या मोबाइल टॉवरची स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्यात आली असून, देशभरात सुमारे ६५ हजार टॉवर्स या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बीएसएनएलने स्वकष्टाने उभारलेले हे टॉवर खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव आम्ही कदापि पूर्ण होऊ देणार नाही. खेड्यापाड्यात तोटा सहन करून ग्राहकांना सेवा देण्यासाठी सरकार काही पावले उचलत नाही. देशभरात रोमिंग फ्री व इनकमिंग कॉल फ्री, सर्वात पहिल्यांदा बीएसएनएलने सुरू केले. मात्र, प्रचलित दराचा फटका कंपनीला बसला आहे. त्यामुळे २५ ते ३० टक्के उत्पन्नात घट झाली आहे. सामान्य जनतेला माफक दरात सेवा मिळण्यासाठी सरकारने बीएसएनएलकडे गांभीर्याने पाहावे लागेल. मात्र, सरकारने बीएसएनएलचे महत्त्वाचे ॲसेट असलेले टॉवर्स वेगळ्या कंपनीकडे हस्तांतरित करण्याने बीएसएनएल अधिकच कमकुवत होणार आहे. भविष्यात आपल्याच टॉवरचे भाडे खाजगी कंपनीला द्यावे लागेल असे यावेळी सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment