मुंबई । जेपीएन न्यूज टीम -
शहरात विविध विकास कामे सुरु असतात, काही ठिकाणी टोलेजंग इमारती उभारल्या जातात. या कामांच्या आड येणारी झाडे तोडली जातात किंवा झाडांवर विषप्रयोग करून मृत केली जातात. यामुळे मुंबईतील झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.एका सामाजिक संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार एका वर्षात तब्बल 5 लाख झाडे कमी झाल्याचे उघड झाले आहे. शहरात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळेही झाडांची खुलेआम कत्तल सुरु असल्याने झाडांच्या संख्या अंकही कमी होणार आहे. प्रजा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेकडून मुंबई महापालिकेकडून माहिती अधिकारात मिळवलेल्या आकडेवारीनुसार एक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या अहवालानुसार मुंबईत सन 2013-14 मध्ये 19 लाख 17 हजार 844 झाडे होती. सन 2014-15 मध्ये त्यात वाढ होऊन 24 लाख 11 हजार 508 झाडांची तर सन 2015-16 मध्ये 35 लाख 98 हजार 354 झाडांची नोंद झाली होती. मात्र सन 2016-17 मध्ये झाडांची संख्या कमी होऊन 31लाख 6 हजार 868 झाडांची नोंद झाली आहे. अहवालातील आकडेवारी पाहिल्यास आणि 2016-17 या वर्षात सन 2015-16 पेक्षा तब्बल 4 लाख 91 हजार 486 झाडे कमी झाली आहेत.
या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पालिकेच्या बी, सी, डी, ई, एच पूर्व, एच पश्चिम, एम पूर्व आणि टी विभागात 2015-16 आणि 2016-17 या वर्षात झाडांच्या संख्येत कोणताही बदल झालेला नाही. एफ दक्षिण, जी दक्षिण, एल, पी उत्तर, आर उत्तर, आर दक्षिण या विभागात झाडांची संख्या कमालीने कमी झाली आहे. तर एफ उत्तर, जी उत्तर, एच पश्चिम, एम पूर्व, एन, पी दक्षिण, आर मध्य आणि एस या विभागात झाडांची संख्या वाढली आहे. के पूर्व, एम पश्चिम, एन, पी दक्षिण, एस या विभागात २ लाखांहून अधिक झाडे आहेत. डी, एफ उत्तर, के पश्चिम, एम पूर्व, पी उत्तर, आर मध्य या विभागात एक लाखाहून अधिक झाडे आहेत. तर ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, जी उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व, एच पश्चिम, एल, आर उत्तर, आर दक्षिण आणि टी विभागात एका लाखाहून कमी झाडे आहेत.
झाडे कमी होण्याची कारणे -
मुंबईत गेल्या काही वर्षात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. या कामाआड येणारी झाडे कोणाचाही विरोध किंवा मुलाहिजा न ठेवता तोडण्यात येतात. काहीवेळा तर झाडांवर विषप्रयोग करून झाडे मृत केली जातात. मृत झालेली झाडे पडून अपघात होईल अशी भींती निर्माण करून पालिकेकडून झाडे पाडण्याची परवानगी मिळवली जाते. काही सरकारी विकास कामात अडथळा येणारी झाडेही तोडली जातात. मेट्रोच्या कामामुळे गेल्या काही महिन्यात झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. यामुळे झाडांची आकडेवारी आणखी कमी होणार आहे.
पालिका आयुक्ताना दणका -
पालिका आयुक्ताना दणका -
झाडे तोडण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी आवश्यक असते. वृक्ष प्राधिकरण सदस्यांना असलेले अधिकार कमी करून 25 झाडांपर्यंतची झाडे तोडण्यास महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या अधिकारात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यास परवानगी दिली जात असल्याने आयुक्तांना देण्यात आलेल्या अधिकाराला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याप्रकरणी सुनावणी दरम्यान आयुक्तांना दिलेले विशेष अधिकार न्यायालयाने रद्द केले आहेत. प्रत्येक झाड महत्वाचं आहे. वृक्ष तोड तातडीने थांबवा. धोकादायक झाडाचं तोडा. वृक्ष प्राधिकरणाच्या देखरेखीखाली झाडे तोडण्याची परवानगी द्या असे निर्देश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.
महापालिका पर्यावरणाची वाट लावत आहे -
महापालिका पर्यावरणाची वाट लावत आहे -
मुंबई महापालिका झाडे कमी करण्याचेच काम करत आहे. झाडे तोडण्याची परवानगी देऊन पालिका पर्यावरणाची वाट लावत आहे. झाडे कापली तर त्या ठिकाणी नव्याने झाडे लावली गेली पाहिजेत. मात्र नवी झाडे लावली जात नाहीत. झाडे कापल्यानेच मुंबईमधील वातावरणात बदल जाणवत आहे. नवी झाडे लावण्याची मागणी महापालिकेकडे करू.
- रवी राजा, विरोधी पक्ष नेते. मुंबई महापालिका
- रवी राजा, विरोधी पक्ष नेते. मुंबई महापालिका
झाडांची आकडेवारी
वॉर्ड 2013-14 2014-15 2015-16 2016-17
ए 41,838 81,516 83,201 83,201
बी 6,786 7,816 7,816 7,816
सी 3,919 5,756 5,756 5,756
डी 58,207 98,478 1,00,317 1,00,317
ई 39,270 57,128 58,028 58,028
एफ उत्तर 54,330 85,897 87,240 1,84,837
एफ दक्षिण 82,417 1,84,837 1,84,837 87,240
जी उत्तर 45,912 92,178 94,774 96,620
जी दक्षिण 43,341 43,341 96,620 94,774
एच पूर्व 74,092 74,092 74,092 74,092
एच पश्चिम 83,176 83,176 83,176 83,176
के पूर्व 1,56,508 1,56,508 1,60,004 2,15,728
के पश्चिम 1,36,262 1,36,262 1,40,674 1,73,232
एल 1,21,075 67,758 6,76,758 67,758
एम पूर्व 83,862 92,445 1,51,949 1,62,638
एम पश्चिम 1,44,790 1,05,631 2,13,084 2,13,084
एन 67,828 80,483 2,86,894 2,92,965
पी उत्तर 67,758 2,58,045 2,84,271 1,86,002
पी दक्षिण 84,510 1,59,649 1,79,452 2,84,271
आर मध्य 1,05,631 67,808 67,808 1,44,790
आर उत्तर 80,483 84,510 84,510 67,808
आर दक्षिण 92,445 1,44,790 1,44,790 84,510
एस 1,59,217 1,59,217 2,48,116 2,54,038
टी 84,187 84,187 84,187 84,187
एकूण 19,17,844 24,11,508 35,98,354 31,06,868
No comments:
Post a Comment