मुंबई - मुंबईत शेतमाल विकण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये तसेच त्यांना शेतमाल विकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. या अनुषंगाने तातडीने एक बैठक घेतली असून या बैठकीत शेतकऱ्यांना आपला माल विकता यावा म्हणून २५ ठिकाणे निश्चित करण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.
मुंबईत शेतमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर गेल्याच आठवडय़ात पालिकेच्या अधिकाऱयांनी कारवाई केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या भाज्या मंत्रालया समोर फेकल्या होत्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, या भेटीत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यावेळी शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन देतानाच शेतकऱ्यांच्या आठवडा बाजारावर तातडीने निर्णय घ्या अशा सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना केल्या. त्यानंतर महापौरांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बाजार व उद्यान समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष हाजी हालीम शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याबैठकीत माल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करू नये असे निर्देश महापौरांनी दिले. आयुक्तांनीही पालिकेने ठरवून दिलेल्या जागांवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची विक्री केली तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही असे आश्वासन बैठकीदरम्यान दिले. शेतकऱ्यांना कांदिवली या ठिकाणी आपल्या शेतमालाची विक्री केली, परंतु ही जागा महापालिकेने शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल मुंबईत विकण्यासाठी २५ ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकता येईल, परंतु त्यांनी जर मुंबईत कुठेही आपला शेतमाल विकला तर त्यांची गणना अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये होईल, असे आयुक्तांनी सांगितल्याची माहिती महापौरांनी दिली.
No comments:
Post a Comment