साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी उपक्रम -
मुंबई । प्रतिनिधी - पावसाळयात मुंबईची तुंबई होते. मुंबईत ज्या ठिकाणी पाणी तुंबते त्या ठिकाणच्या बिळांमधील उंदरांमुळे पसरणार्या रोगराईला आळा घालण्यासाठी पालिकेकडून ‘विशेष मोहीम आखली जाणार आहे. या मोहीमेअंतर्गत उंदारांची बिळे शोधून उंदरांची संख्य़ा कमी केली जाणार आहे. मार्च, एप्रिल ते मे या तीन महिन्यांमध्ये हा उपक्रम वेगाने राबवला जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी ९५ टक्क्यांपर्यंत उंदरांचे प्रमाण कमी करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
पाणी तुंबणार्या ठिकाणी असणार्या बिळांमध्ये मोठ्या प्रमाणात उंदरांचे वास्तव्य असते. या ठिकाणी पाणी तुंबल्यानंतर लॅप्टोस्पायरोसिससारखे साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर विशेष मोहिमेंतर्गत आता उंदरांची बिळे बंद केली जाणार आहेत. हे बिळ जर पुन्हा उघडले गेलेले दिसल्यास त्या ठिकाणी उंदीर असल्याची खात्री होईल. या ठिकाणी पॉयझन अथवा इतर उपायांनी उंदरांना मारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे कीटकनाशक अधिकारी डॉ. राजन नारिंग्रेकर यांनी दिली. या मोहिमेमुळे उंदरांचे मलमूत्र पाण्यात मिसळून होणार्या रोगांना आळा बसेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालिका कर्मचार्यांच्या माध्यमातून सध्या उंदीर मारले जात आहेत. मात्र संपूर्ण मुंबईत वाढलेल्या उंदरांच्या संख्येमुळे या ठिकाणीही नियंत्रण आणण्याची गरज आहे. यासाठी ‘एनजीओ’ची मदत घेतली जाणार आहे. मात्र उंदीर मारण्याच्या कामासाठी पुन्हा निविदा मागवून हे काम प्रभावीपणे केले जाणार आहे. सध्या मारलेल्या एका उंदरामागे १८ रुपये दिले जातात. मारलेल्या उंदीरांची गणना वॉर्ड आणि सेनापती बापट मार्ग येथील लॅबमध्ये केली जाते. या लॅबमध्ये उंदरांची प्लेग टेस्टही करण्यात येते. विभागानुसार एका दिवसात १०० ते १५० उंदीर मारण्याचे उद्दिष्ट्य आहे. सध्या काही विभागात १०० ते १५० चे उद्दिष्ट्य आहे. पूर्व उपनगरात ‘एम’ वेस्ट, ‘एस’, ‘एन’, शहरात एफ नॉर्थ आणि डी येथे पायलट प्रोजेक्ट सुरू आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिका-यांनी दिली.