मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत देण्यात येणारी जलदेयके (पाणी बील) अद्ययावत करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने मे. ए. बी. एम. नॉलेजवेअर लि. या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. जलदेयके अद्ययावत करण्यासाठी महापालिका ११ कोटीं रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागाकडून ग्राहकांना त्यांनी केलेल्या पाण्याच्या वापरानुसार जलदेयके दिली जातात. २००१ पासून संगणकीय जलदेयके ग्राहकांना पाठवली जातात.पालिकेकडून वापरात असलेली एक्वा सुपर जलदेयक प्रणाली जुनाट व किचकट ठरत आहे. त्यामुळे जलदेयके अद्यावत व विकसित करण्याचा निर्णय जल अभियंता विभागाने घेतला आहे. त्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात मे. ए. बी. एम. नॉलेजवेअर लि. या कंत्राटदारास लघुत्तम देकार मानून पालिकेने ११ कोटींचे कंत्राटकाम देण्याचा निर्णय घेतला. या कंत्राटदाराने, सध्याच्या जलदेयक प्रणालीचा अभ्यास करणे, ही प्रणाली अद्यावत करणे, माहिती व्यवस्थापन सेवा अखंडपणे पुरवणे तसेच ६ महिन्यात सुधारित एक्वा सुपर जलदेयक प्रणाली विकसित व अद्यावत करून ६० महिने प्रचालन व परिरक्षण करावयाची आहेत.