मुंबई । प्रतिनिधी - एल्फिस्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पादचारी पुल जीवघेणे ठरत असल्याने पुलांच्या दुरुस्तीचे काम करण्यास सांगण्यात आले. मात्र चर्नीरोड येथील पुल याला अपवाद ठरला आहे. चर्नीरोड येथील पादचारी पूल धोकादायक असल्याने पाडण्यात आला मात्र अद्याप त्याचे काम सुरु झालेले नाही. हा पुल अर्धवट तोडून तसाच ठेवण्यात आल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
14 आक्टोबर 2017 ला चर्नीरोड स्थानकाबाहेरील पुलाच्या पायऱ्या कोसळसल्या आणि या घटनेत एक प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तात्काळ हा हा पूल नव्याने बांधण्याचे फर्मान देखील काढण्यात आले होते. मात्र हा पूल अद्याप पूर्ण झाला तर नाहीच पण अर्धवट तोडून ठेवलेल्या पूलामुळे तिथल्या रोज ये जा करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. कारण या पूल अर्धवट तोडून ठेवलाय खरा पण प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे तुम्ही जर जाताय तर थोडे जपूनच कारण अर्धवट तोडलेल्या ब्रिजचा वरचा भाग कधीही तुमच्या डोक्यात पडू शकतो. विशेष म्हणजे गिरगावातील ठाकूरद्वार परिसरातून बाबासाहेब जयकर मार्गावरून रेल्वे स्थानकात येणारा पादचारी पूल बंदच करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना जर या दिशेने प्रवास करायचा असल्यास या अर्धवट तुटलेल्या पुलाखालूनच प्रवास करण्याशिवाय पर्याय उरला नाही. खर तर कामाला सुरूवात करण्यासाठी तिकडे आवश्यक ती काळजी पालिकेकडून घेणे आवश्यक आहे. मात्र ब्रिज तोडण्याचे काम सुरू असताना कोणतीही सुरक्षा जाळी लावण्यात आली नव्हती मात्र उशिराने जाग आलेल्या पालिका प्रशासनाने जाळीचे पडदे लावले तेही तुटलेले. तसेच हे काम लवकरच पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र पूल दुर्घटना होऊन सहा महिने व्हायला आलेत तरी देखील हा पूल पूर्ण न झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा पादचारी पूल बंद असल्यामुळे चर्नीरोड स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडून प्रवास करावा लागतो. ज्यामुळे वाहतुकीला ही अडथळा निर्माण होतो.