
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड दरवर्षी एप्रिल महिन्यात केली जाते. त्याआधी या समित्यांमधील जुन्या काही सदस्यांना निवृत्ती देऊन नव्या सदस्यांना संधी दिली जाते. सत्ताधारी शिवसेनेने आपले जेष्ठ सदस्य मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा होती. मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांसाठी सातमकर आणि चेंबूरकर यांचे राजीनामे घेतल्याचीही चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका सभागृहात मंगेश सातमकर यांची शिक्षण समितीवर, आशीष चेंबूरकर यांची बेस्ट समितीवर, तर दिलीप लांडे यांची सुधार समितीवर नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरात भाजपाचे राजकीय वजन वाढत चालल्याने भाजपाला व्यसन घालण्यात शिवसेनेचे समित्यांचे अध्यक्ष असलेले नवीन नगरसेवक कमी पडत होते. पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. यावेळेत भाजपाला मुंबईत लगाम लावणे आवश्यक असल्याने शिवसेनेने आपल्या जुन्या व अनुभवी नगरसेवकांना समित्यांच्या अध्यक्षपदावर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून समित्यांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. स्थायी समितीवर नुकतीच मिलिंद वैद्य आणि परमेश्वर कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता माजी महापौर विशाखा राऊत यांचेही नाव जाहीर करण्यात आले आहे. राजुल पटेल आणि सुजाता सानप यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून संधी देण्यात आली आहे. भाजपने सगळय़ा जुन्याच सदस्यांना संधी देताना सुनीता यादव यांच्याऐवजी कमलेश यादव यांना तर अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना पुन्हा संधी दिली आहे.
शिक्षण समितीवर स्थायी समितीमधून तडकाफडकी राजीनामा घेतलेले मंगेश सातमकर यांना पाठवण्यात आले आहे. माजी महापौर स्नेहल आंबेकर, विद्यमान अध्यक्ष शुभदा गुडेकर, संध्या दोशी यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून संधी देण्यात आली आहे. भाजपकडून उज्ज्वला मोडक, श्रीकला पिल्लई, नेहा शहा यांची तर राष्ट्रवादीकडून डॉ. सईदा खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुधार समितीवर मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेत आणण्याची महत्तवपूर्ण भूमिका बजावणारे दिलीप लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह राजू पेडणेकर, समृद्धी काते यांना नव्याने संधी दिली आहे. तर माजी महापौर श्रद्धा जाधव, विद्यमान सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर, चित्रा सांगळे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. भाजपच्यावतीने ज्योती अळवणी, सागर ठाकूर यांना पुन्हा संधी देतानाच हरीश छेडा, विनोद मिश्रा यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून धनश्री भरडकर, समाजवादी पक्षाकडून अख्तर अब्दुल रझाक कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बेस्ट समितीवर शिवसेनेकडून आशीष चेंबूरकर यांच्यासह अनिल कोकीळ, अनिल पाटणकर यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपकडून श्रीकांत कवठणकर, सुनील गणाचार्य, मुनजी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.