मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान म्हणजेच राणीबागेत प्राण्यांसाठी सात नवीन पिंजरे उभारण्यात येणार आहेत. सातपैकी दोन पिंजरे वाघांसाठी तर सिंह, निलगाय , तरस, बारशिंगी, हरिणासाठी प्रत्येकी एक पिंजरा उभारला जाणार आहे. काही प्राणी इतर प्राणी संग्रहालयातून मागविण्यात येणार आहेत. देशातील प्राणिसंग्रहालये प्राण्यांची देवाण घेवाण करतात. त्यानुसार ही देवाण घेवाण केली जाणार आहे. प्रशासनाकडून यासाठी ५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळाली आहे.
मुंबईतील जिजामाता उद्यानात रोज पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथे हंबोल्ट पेंग्विन आल्यानंतर या गर्दीत आणखी वाढ झाली आहे. राणी बागेत येणा-या पर्यटक, मुंबईकरांना पाहण्यासाठी येथे विविध प्रकारचे प्राणी ठेवण्यात आले आहेत. या प्राण्यांसाठी असलेलेले 17 पिंजरे जुने झाले आहेत. राणी बागेचा विकास करण्याची योजना पालिकेने आखली आहे. त्यामुळे येथील जुने पिंजरे काढून तेथे शोभिवंत नवीन पिंजरे बसवण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला आहे. वाघ, सिंह, तरस, हत्ती , गवा, अस्वल, हायना, निलगाय पाणघोडा, लांडगा, उंट, कोल्हा आदी इंडियन प्राण्यांसाठी हे नवीन पिंजरे बसवले जाणार आहेत. 17 पैकी सात पिंज-यांसाठीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित 10 पिंज-यांसाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरु आहेत. पिंजरे बसवण्यासाठीचे काम 16 महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. काही प्राण्यांची देवाणघेवाण करण्यासाठी इतर प्राणी संग्रहालयाशी बोलणे सुरु केले आहे. सिंहाबाबत गुजरातमधील जुनागडशी बोलणे झाले आहे तर हकानपुर प्राणिसंग्रहालय तरस ची जोडी देणार आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या नियमानुसार हे पिंजरे बांधण्यात येणार आहेत, असे उद्यानचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.