ठाणे मॉडेल ऐतिहासिक ठरेलः पहिला टप्पा दिवाळीनंतर -
ठाणे - शहर नियोजनाची संधी पुन्हा पुन्हा येत नसून क्लस्टरमुळे ठाण्याला ही संधी प्राप्त झाली असून या ऐतिहासिक प्रकल्पामुळे जुन्या ठाण्याचे रूप बदलणार असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. क्लस्टरचे हे ''ठाणे मॉडेल'' ऐतिहासिक असून यामुळे ठाणेकरांना हक्काची घरे मिळणार आहेत असे सांगून या प्रकल्पासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्या टीमचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणा-या क्लस्टर योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (२) समीर उन्हाळे, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर, राष्ट्रवादीचे गटनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे गटनेते यासीन कुरेशी, शहर विकास व नियोजन अधिकारी निंबाळकर, संजय देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे यांनी क्लस्टर हा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असून सन 2004 पासून या प्रकल्पासाठी सर्वचजण पाठपुरावा करीत आहेत. हा प्रकल्प मार्गी लागेल असा विश्वास नव्हता पण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्या टीमने केलेल्या अथक परिश्रमामुळे सन 2018 साली या प्रकल्पाला मुर्त स्वरूप प्राप्त होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. क्लस्टरमुळे ठाणेकरांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहेत.
या प्रकल्पामुळे शहराच्या नियोजनाची संधी पुन्हा प्राप्त झाली आहे. यामुळे जागेच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून यामुळे तलावांचेही पुनरूज्जीवनही होणार असल्याचे सांगितले. नवीन ठाण्याचा विकास झाला पण क्लस्टरमुळे जुन्या ठाण्यालाही नवे रूप प्राप्त होणार आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहराच्या लोकसंख्येचा विचार करून क्लस्टर प्रकल्प तयार करण्यात आला असून भविष्यात शहराची लोकसंख्या 32 लाखाच्या घरात जाणार आहे. आजच्या घडीला जवळपास 58 टक्के लोकांना परवडणारी घरे मिळू शकत नाही तर 8 टक्के लोकांची घर घेण्याची ऐपत नाही. घरांची मागणी आहे पण जमीन उपलब्ध नसल्यामुळे ती बांधू शकत नाही. क्लस्टर योजनेमुळे 25 वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पातून केवळ घरेच दिली जाणार नाहीत तर रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक क्लस्टर विभागात लोकसंख्येनुसार किती शाळा, महाविद्यालये, दवाखाने, खेळाची मैदाने असावित याचाही विचार करण्यात आला आहे असे सांगितले.
या योजनेतंर्गत कमी जागा धारकांना 300 चौरस फुटाचे घर मिळणार आहे तर ज्यांचे क्षेत्रफळ जास्त असेल त्यांना 25 टक्के जास्त फायदा मिळणार आहे. या योजनेतंर्गत एकूण 5903 हेक्टर क्षेत्रफळ विकसित केले जाणार असून पहिल्या टप्प्यात २३ टक्के विकास केला जाणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
या प्रकल्पातंर्गत अनधिकृत इमारतींचाही समावेश करण्यात आला असून 53 टक्के धोकादायक इमारती तसेच ना विकसित क्षेत्रातील घरांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पाबाबत 30 दिवसांत सूचना व हरकती मागविण्यात येणार असून सूचना व हरकतीचा समावेश करून येत्या काही दिवसांत प्रकल्पाचा अंतीम आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दिवाळीनंतर या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले.