शेतकऱ्यांच्या मोर्चाला यश, सरकारकडून लेखी आश्वासन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 March 2018

शेतकऱ्यांच्या मोर्चाला यश, सरकारकडून लेखी आश्वासन


मुंबई - नाशिक ते मुंबई असा तब्बल १८० किलोमीटर काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँगमार्चपुढे राज्य सरकारला झुकावे लागले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत असल्याचे लेखी आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना २००१ सालापासून कर्जमाफी मिळणार असून कुटुंबातील सर्व खातेदारांची कर्जमाफी होणार आहे. सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. 

नाशिकहून निघालेला हा लाँगमार्च मुंबईकरांची तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारी रात्रीच आझाद मैदानावर आला. त्यानंतर दुपारी मोर्चेकऱ्यांच्या १२ जणांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्र्यांच्या गटाबरोबर जवळजवळ साडेतीन तास चर्चा केली. या चर्चेत मंत्रिमंडळातील सदस्य चंद्रकांत पाटील, पांडुरंग फुंडकर, गिरीष महाजन, विष्णू सवरा, एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांकडून कॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, आमदार जीवा पांडू गावित, जयंत पाटील, कपिल पाटील आदींचा सहभाग होता. बैठकीनंतर मोर्चेकऱ्यांच्या नेत्यांनी तिघा ज्येष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत मान्य झालेल्या मागण्यांचे लेखी आश्वासन उपस्थितांपुढे वाचून दाखवत यशस्वी आंदोलन संपल्याचे जाहीर केले.

यानुसार आता २००१ सालापासून २००८ सालापर्यंतच्या तसेच ३० जून २०१७ पर्यंतच्या थकित कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यातील कुटुंबाची अट काढून टाकण्यात येणार असून कुटुंबातील सर्व खातेदारांना कर्जमाफी मिळणार आहे. संपूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी शेतकरी संघटना तसेच सरकारच्या एकत्रित समितीकडून केली जाईल. नव्या अर्जदाराला ३१ मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येईल. प्रलंबित अर्जांची येत्या दीड महिन्यात पुन्हा छाननी होईल. सर्व खातेदारांची माहिती तीन महिन्यात गोळा केली जाईल.

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करताना सर्व प्रलंबित दावे सहा महिन्यात निकाली काढले जातील. प्रत्यक्ष ताबा जास्त असल्यास पुन्हा मोजणी करून दहा एकरपर्यंतची जमिन कसणाऱ्याच्या नावावर केली जाईल. अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाईल. नारपार, पिंजाळ आदी प्रकल्पाच्या माध्यमातून अरबी समुद्रात वाया जाणारे पाणी गोदावरी आणि कृष्णा खोऱ्यात सोडले जाईल. महाराष्ट्राच्या वाटेचे पाणी राज्यातील शेतकऱ्यांनाच दिले जाईल. देवस्थान, गायरान व इनामी जमिनींवरील अतिक्रमणांबाबत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्यापर्यंत मागवून पुढच्या दोन महिन्यात त्यावर निर्णय होईल. गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणार. श्रावणबाळ तसेच संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान ६०० रूपयांवरून २००० रूपये करण्याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेणार. जीर्ण झालेल्या शिधापत्रिका बदलून देणार तसेच त्यावर विभक्तीकरण हवे असल्यास तेही करणार. 

बोंडअळी, तुडतुडे तसेच गारपीटग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून येणाऱ्या नुकसानभरपाईची वाट न पाहता तातडीने देण्यात येणार. पेसा कायद्याखाली जमीन संपादित करताना जमीनमालकाची संमती घेणार. राज्य कृषिमूल्य आयोगाचे पुनर्गठन करताना शेतकरी संघटनांचे दोन प्रतिनिधी घेणार. वयाचा दाखला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अदिकाऱ्याकडून मिळणार, आदी निर्णय झाल्याचे आंदोलकांच्या नेत्यांनी जाहीर केले. दरम्यान, कर्जमुक्ती, वन जमिनींचा ७-१२ नावावर होत नाही. तोपर्यंत लढा कायम राहणार असल्याची घोषणा अशोक नवले यांनी आझाद मैदानावर केली.

रेल्वेने आंदोलकांच्या सोयीसाठी रात्री जळगावसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या सोडल्या होत्या. तसेच एसटी महामंडळाकडून आंदोलनकर्त्यासाठी खास बसेस सोडण्यात आल्या. 

७०० जखमी शेतकऱ्यांवर उपचार -नाशिकहून १८० किलोमीटर पर्यत पायपीट करत आलेल्या शेकऱ्यांचे आरोग्य ढासळले होते. तब्बल ७०० शेतकऱ्यांवर सोमवारी उपचार करण्यात आले. काहीं शेतकऱ्यांवर जेजे व सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. अनेकांना डिहायड्रेशन, उलट्या, डोकेदुखी आणि शरीरातील वेदना सहन करण्याच्या पलिकडे गेल्या होत्या. तसेच ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. संजय वाठोरे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या एम्बुलेंसमध्येही उपचार दिले. उपचार घेणाऱ्यापैकी एक शेतकरी सखुबाई होत्या ज्याचे पाय रक्ताळले होते पण त्या थांबल्या नाहीत. दुखापतीमुळे चालण्यास असमर्थ असलेल्या सखुबाई यांच्याशि संवाद साधला असता शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत मी थांबणार नाही असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी सामाजिक संघटना व महापालिकेकडून सोयी सुविधा - 180 किलोमीटर पायपीट करत आलेला शेतकरी रविवारी मुंबईच्या हद्दीत आल्यापासून मुंबईतील विविध संघटनांनी पाणी, सरबत, खाण्याची व्यवस्था केली होती. मुंबई महापालिकेच्या वतीनेही रविवारी सोमय्या मैदानात पाण्याचे टँकर तसेच मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था केली होती. सोमवारी मोर्चा आझाद मैदानात पोहचला. सोमय्या मैदानपासून आझाद मैदानात आलेल्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 130 सिट्सची शौचालये, 7 महापालिकेचे पाण्याचे टँकर, 6 खाजगी पाण्याचे टँकर, 2 खाजगी ऍम्ब्युलन्स, 2 धुम्र फवारणी करणाऱ्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या. आझाद मैदानात आणि परिसरात स्वच्छता राखावी म्हणून अतिरिक्त सफाई कर्मचारी तैनात करण्यात आले होते. महापालिकेच्या आणि राज्य सरकारच्या तैनात करण्यात आलेल्या ऍम्ब्युलन्समध्ये शेतकऱ्यांवर उपचार केले जात होते. नाशिकहून आझाद मैदानात चालत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईकर नागरिक धावून आले. अनेक सामाजिक संघटनांकडून चप्पलचे वाटप करण्यात आले. सामाजिक व विशेषकरून मुस्लिम संघटनाकडून शेतकऱ्यांना पाणी तसेच भोजनाचे वाटप करण्यात आले.

बेस्ट मार्ग वळवले - शेतकरी मोर्चानिमित्त महानगरपालिका मार्ग बंद ठेवण्यात आल्याने बेस्टच्या बसमार्ग क्रमांक १४,२८,६६,६९,११४,१२६ च्या बसगाड्या डी एन मार्गाने वळवण्यात आल्या होत्या.

Post Bottom Ad