मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील सुप्रसिद्ध राणी बागेची स्वच्छता राखण्याचे काम इतका मोठा परिसर स्वच्छ राखण्याचा अनुभव नसलेल्या दोन कंपन्यांना दिले जाणार आहे. या कंपन्यांनी गेल्या काही वर्षात स्वच्छता राखण्याचे काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र दिले नसताना केवळ नागपूर कनेक्शन मुळे या कंपन्यांना ५ कोटी रुपयांचे काम दिले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
भायखळा येथे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीबागेत १७ जून २०१७ ला पेंग्विन कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर प्राणिसंग्रहालयात लोकांची गर्दी वाढत असल्याचा दावा प्राणी संग्रहालय प्रशासनाने केला आहे. त्यासाठी प्राणी संग्रहालयात रोज ११ ते १५ हजार तर सुट्टीच्या दिवशी २० हजार लोक भेट देत असल्याची आकडेवारी प्रशासनाने दिली आहे. प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या लोकांची गर्दी वाढल्याने स्वच्छता नीट होत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयात स्वच्छता राखावी म्हणून दोन वर्षासाठी कंत्राट देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. त्याला कल्पतरुज हॉस्पिटॅलिटी व फॅसिलिटी मॅनेजमेंट या दोन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. या कंपन्यांनी यापूर्वी सन २०१२ ते २०१४ या कालावधीत नागपूर रेल्वे स्थानकावरील चिकित्सा अधिक्षकांच्या कार्यालयातील हाऊस किपिंगचे तर २०१३ ते २०१५ या कालावधीत बांद्रा येथील देना बँकेच्या देना कॉर्पोरेट सेंटरच्या हाऊसकिपिंगचे काम केले आहे. गेल्या तीन ते चार वर्षात या दोन्ही कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचे हाऊसकिपिंगचे काम केल्याचे प्रमाणपत्र जोडलेले नाही. तसेच या दोन्ही कंपन्यांना प्राणीसंग्रहालया इतका मोठा परिसर स्वच्छता राखण्याचा अनुभव नसताना दोन वर्षासाठी ५ कोटी ३० लाख ५६ हजार ५७८ रुपयांचे काम दिले जाणार आहे. मुंबई महापालिकेत राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढला असून या कंपन्यांचे नागपूर कनेक्शन असल्याने या कंपन्यांना प्राणिसंग्रहालयाच्या स्वच्छतेचे काम दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे.