मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना, कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण, लहान बालके चोरी होणे इत्यादी घटना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. मात्र महापालिका प्रशासनाकडून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची नेमणूकच केली जात नसल्याने येथे सुरक्षेअभावी अनुचित प्रकार घडू शकतो अशी शक्यता रुग्णालय दक्षता समितीचे प्रकाश वाणी यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई पूर्व उपनगरातील पालिकेच्या छोट्या रुग्णालयांसाठी राजवाडी रुग्णालय हे महत्वाचे असे रुग्णालय आहे. उपनगरात आग लागणे, अपघात होणे, सिलेंडरचा स्फोट होणे, मारामाऱ्या इत्यादी प्रकार सातत्याने घडत असतात. अशावेळी रुग्णांना राजावाडी रुग्णालयात आणण्यात येते. राजावाडी रुग्णालयात ४० सुरक्षा रक्षकांच्या जागा असून त्यापैकी १२ सुरक्षा रक्षक तीन पाळ्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा सांभाळत असतात. सुरक्षा रक्षकांच्या जागा रिक्त असल्याने प्रत्येक पाळ्यांमध्ये फक्त ४ सुरक्षा रक्षक आपली ड्युटी बजावत आहेत. रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार, इमरजंसीसाठी असलेले प्रवेशद्वार, रुग्णालयाची इमारत, आयसीयू, ओपीडी, इमरजंसी विभाग या ठिकाणची सुरक्षा यंत्रणा ४ सुरक्षा रक्षकांना सांभाळावी लागत आहे. धुळीवंदनाच्या दिवशी दोन गटामध्ये मारामाऱ्या झाल्या, दोन्ही गटामधील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यावेळी रुग्णालयाच्या इमरजंसी विभागापुढेच दोन्ही गटात पुन्हा मारहाण झली. यावेळी रुग्णालयातील ४ सुरक्षा रक्षक महिला असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली अशी माहिती प्रकाश वाणी यांनी दिली. रुग्णालयाच्या डीनकडून सातत्याने पत्रव्यवहार करूनही अद्याप सुरक्षा रक्षकांच्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सात जवान रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी पाठवण्यात येणार होते. मात्र ते जवानही अद्याप आले नसल्याने राजवाडी रुग्णालयाच्या सुरक्षेकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाणी यांनी केला आहे. राजावाडी रुग्णालयात अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्वरित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी वाणी यांनी केली आहे.
दरम्यान रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ११ कोटी रुपये खर्च करून ७०० हुन अधिक महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान मागवण्यात आले. त्यापैकी राजावाडी रुग्णालयासाठी कोणाचीही नेमणूक का केली नाही? ज्या जवानांची नेमणूक केली त्यांनी या ठिकाणी ड्युटी का स्वीकारली नाही ? पालिकेने ९६८ सुरक्षा रक्षकांची पदे भरली, राजावाडी रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त असताना या सुरक्षा रक्षकांची नेमणूक का करण्यात आली नाही ? असे अनेक प्रश्न रुग्ण आणि नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.