निवडणुका जिंकण्यासाठी भाजपवाले दंगली घडवतील - राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2018

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपवाले दंगली घडवतील - राज ठाकरे


मुंबई - आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपवाले दंगली घडवतील. त्यासाठी न्यायालयात राम मंदिराचा वाद पुढे ढकलला जातो आहे. राममंदिर व्हायला पाहिजे, पण त्याचा वापर निवडणुका जिंकण्यासाठी नको, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवर यांनी सांगितले. यावेळी एकत्र या, एकत्र लढा आणि देशाला झालेला मोदी आजार संपवा, असे आवाहनही त्यांनी मराठी बांधवांना केले. दादरच्या शिवाजी पार्कवर गुढीपाडव्यानिमित्त मनसेच्या वार्षिक मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा नुसता शो चालू आहे. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रातून घडत काहीच नाही. गुंतवणुकीचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. माध्यमे, न्यायसंस्थांवर दबाव टाकला जातो आहे. हे असेच चालू राहिले तर देश बरबाद होईल. म्हणून २०१९ च्या निवडणुकीत देशाला तिसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून द्या, ‘देश मोदीमुक्त करा’ अशी हाक मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली. 

राज यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यातील प्रश्न संपले असावेत, म्हणूनच मुख्यमंत्री गाणे गात असावेत. आमचे मुख्यमंत्री म्हणजे वर्गातला माॅनिटर आहे. जो शिक्षकांना आवडतो, पण विद्यार्थ्यांचा नावडता असतो. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यांनी शोले चित्रपटातील सांबा आणि अभिनेता रजनीकांत यांचा बारावा डमी असे संबोधले. 

केंद्राच्या सांगण्यावरून अनेक संपादक, पत्रकारांना काढून टाकण्यात आल्याचे राज म्हणाले. मोदी-शहा यांच्या विरोधात लिहिले तर जाहिराती मिळत नाहीत. विरोधात बातम्या लिहू दिल्या जात नाहीत. ही आणीबाणी नाही तर काय आहे? श्रीदेवीची बातमी जितकी दाखवली तितक्या वेळा न्यायाधीश लोया यांच्या बातम्या दाखवल्या का? तोही मृत्यू संशयास्पदच आहे. ही लोकशाही आहे का? हे अच्छे दिन आहेत?’ असे म्हणत मोदी-शहा यांचे राजकारणाचे हे तंत्र हिटलरचे असल्याचा दावा त्यांनी केला.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आकड्यांचे फुगे सोडतात. राज्यात ५६ हजार विहिरी बांधल्याची राज्य सरकारची थाप आहे. राज्यात शेतकऱ्यांचे राज्य नाही, तर दलालांचे आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना जमिनीचा भाव मिळत नाही, असे आरोप केले. 

मोदी सरकारने बेरोजगारांची नोंदणी करणे बंद केले. अारक्षणासाठी जातीजातीत भांडणे लावली जात आहेत. पात्रता नसताना राफेल कंपनीचे अंबानींच्या कंपनीला कंत्राट कसे मिळाले? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. परदेशी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादलाच कसे नेता, असा प्रश्न उपस्थित करून पंतप्रधानांनी प्रादेशिक अस्मिता जपली असल्याचे राज म्हणाले. 

नोटबंदी भयंकर घोटाळा - 
नोटबंदी हा १९४७ नंतरचा देशातला सर्वात मोठा घोटाळा आहे. पुन्हा भाजपचे सरकार आले तर लोकांची वाट लागेल. जे काँग्रेसच्या काळात जेलमध्ये गेले, ते भाजपच्या काळात बाहेर आले. काँग्रेसच्या काळात जे घडत होते, तेच भाजपच्या काळातही घडतेय, असे सांगत घोटाळेबाज नीरव माेदी पळालाच कसा, असा सवाल राज यांनी विचारला.

Post Bottom Ad