लाठीचार्ज, दगडफेकीत विद्यार्थी पोलीस जखमी -
मुंबई । प्रतिनिधी - रेल्वेमध्ये शिकाऊ विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षात नोकरी न दिल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान तब्बल चार तास रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सकाळीच कामानिमित्त बाहेर पडलेल्या लाखो मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. या आंदोलनकर्त्यांबरोबर साढे तीन तासानंतर रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद साधल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान दिवसभर रेल्वेसेवेवर याचा परिणाम जाणवला.
रेल्वेत अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के असलेला कोटा रद्द करावा, रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, रेल्वे अॅप्रेंटिस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेत सामावून घ्यावे, त्याप्रमाणेच भविष्यातही तोच नियम कायम ठेवावा, यासंदर्भात महिन्याभरात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करु नये, अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, आदी विविध मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (२० मार्च) सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडून रेल्वे गाड्या अडविल्या. मागील तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु, आम्हाला अद्याप नोकरी देण्यात आलेली नाही. आम्हाला नोकरी द्या अन्यथा मरण द्या अशी मागणी करत शेकडो विद्यार्थ्यांनी रेलरोको केला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रेल्वे रुळावरुन हटणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे साढे तीन तास ठप्प असताना कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधला नसल्याने आंदोलकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे ठप्प केल्याने रेल्वे आणि पोलीस प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. मोठ्या संख्येत अॅप्रेंटिसचे विद्यार्थ्यी रेल्वे रुळावर आले मात्र आरपीएफ किंवा पोलीसांची संख्या खूपच तोगडी होती. थोड्यावेळाने पोलिसांनी रेल्वेरुळावर उतरुन विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांनी आपला पवित्रा कायम ठेवल्याने, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थी जखमी झाल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यानी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये जीआरपीचे पाच पोलीस तर आरपीएफचे सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना सायन रुग्णालयात उपचार्थ पाठवण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे, पोलीस निरीक्षकसह साटव, पोलीस उपनिरीक्षक माने, महिला पोलिस कॉन्स्टेबल सानप, महिला पोलिस कॉन्स्टेबल परुळकर, रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) सतेंद्र कुमार, मनोज यादव, धमेंद्र कुमार, जसवीर राणा, प्रकाश लांडगे, सचीन मोर या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान साढे तीन तासानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलकर्त्यांशी संवाद साधल्यावर तब्बल चार तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
रेल्वेतील अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात माजी नगरसेवक संदीप देशपांडे, सुधीर जाधव इत्यादींचा सहभाग होता. यावेळी गेल्या चार वर्षात या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आलेली नाही. गेले तीन चार महिने हे विद्यार्थ्य आपल्या मागण्यांसाठी वेळ मागत होते. रेल्वेमंत्री विद्यार्थ्यांना वेळ देत नसल्याने त्यांना आंदोलन करावे लागले. आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचाज करता का ? मुंबईमधील विद्यार्थ्यांना नोकरी देणार नाही तर कोणाला नोकरी देणार ? असे प्रश्न संदिप देशपांडे यांनी यावेळी उपस्थित केले. हे सर्व विद्यार्थी मराठी असल्याचे आम्ही मानतो म्हणून आम्ही आंदोलना पाठिंबा दिल्याचे देशपांडे यांनी सांगितले. या
20 टक्के कोटा रद्द करण्याची मागणी -
पूर्वी रेल्वे अप्रेटिंसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय, शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
रेल्वे अॅप्रेंटिसच्या मागण्या काय आहेत?
- 20 टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा
- रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी सामाविष्ट करण्यात यावं
- रेल्वे अॅप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवत सामाविष्ट करावं, भविष्यातही नियम लागू ठेवावा
- याबाबत एका महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करु नयेत.
यापूर्वी अर्धनग्न आंदोलन -
यापूर्वी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत अर्धनग्न आंदोलन केलं होतं. रेल्वेने नोकरीत सामावून घेण्यासंदर्भातले नियम बदलल्याने अन्याय होत असल्याचा आरोप करत, 2 हजार तरुणांनी अर्ध नग्न प्रदर्शन करुन सरकारचा निषेध केला होता. पंतप्रधान एकीकडे स्किल इंडियाची भाषा करतात, पण मग आमच्यासारखे ऑलरेडी स्किल अवगत असलेले युवक रेल्वे का नाकारते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
चाकरमान्यांना "बेस्ट" दिलासा -
सकाळी नोकरीसाठी चाकरमानी कामाला निघाले असतानाच विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. रेल्वे स्थानकात अडकून पडलेल्या चाकरमान्यांना आपल्या नियोजित ठिकाणी जाता यावे म्हणून बेस्ट उपक्रम धावून आला. दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईतही ठिकठिकाणी ११५ बस चालवून चाकरमान्यांना बेस्ट दिलासा दिला.