मुंबई । प्रतिनिधी - पदोन्नतील आरक्षण, सातवा वेतन आयोग, पेंशन, पाच दिवसाचा आठवडा, संविधान बचाव, मागासवर्गीयांचे संरक्षण व विकास इत्यादी मागण्यांसाठी ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एप्लॉईज फेडरेशन यांच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सुनील निरभवने, भारत वानखडे, एस. के. भंडारे, डॉ. संदेश वाघ, सिद्धार्थ कांबळे यांनी नेतृत्व केले.
राज्य सरकारने 29 डिसेंबर 2017 च्या पत्रानुसार खुल्या वर्गातील कर्मचा-यांना पदोन्नोती दिली आहे. पदोन्नोती मधला आरक्षण हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्य शासनाला खुल्या वर्गातील कर्मचा-यांना पदोन्नोती देण्याची इतकी घाई का लागली आहे असा प्रश्न करीत पदोन्नोतीत आरक्षण मिळालेचं पाहिजे अशी मागणी एस. के. भंडारे यांनी केली. यावेळी 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू करून कमीत कमी वेतनमर्यादा 24 हजार करावी, मागासवर्गीयांबाबत क्रिमीलेयर लागू करुन समाजामध्ये विभाजन करणारी याचिका सुप्रिम कोर्टाने रद्द करावी , मागासवर्गीय कर्मचा-याचे मानसिक खच्चीकरण थांबवावे, आर्थिक शोषण थांबवावे, इत्यादी मागण्यांचे निवेदन सरकारला देण्यात आले. एम. नागराजन केसमध्ये दिलेल्या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयाने पुर्निविचार करावा किंवा नाही असे सांगत ही याचिका संविधान पीठाकडे पाठविण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे केस प्रलंबित असतानाही राज्य सरकार खुल्या वर्गाला पदोन्नोती देण्याची घाई करु नये असे आवाहन करण्यात आले. या मोर्चाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.