मुंबईकरांना पाण्याचे "नो टेंशन", तलावांत सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा. - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2018

मुंबईकरांना पाण्याचे "नो टेंशन", तलावांत सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा.


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईला पाणीपुरवठा सात तलावांच्या माध्यमातून केला जातो. या सात तलावांमध्ये १४ सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठी शिल्लक असल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेंशन मिटले आहे. तलावांमध्ये सध्या ४४.४५ टक्के म्हणजेच तब्बल ६ लाख ४३ हजार २८३ दशलक्ष लिटर पाणी शिल्लक आहे. हा पाणीसाठा पुढील साडेपाच महिन्यांपर्यंत पुरेल इतका असल्यामुळे उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज भासते. मुंबईला दररोज ४ हजार ५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मात्र प्रत्यक्षात सातही तलावांमधून ३ हजार ९०० दशलक्ष लिटर पाणी आणले जाते. त्यापैकी १५० दशलक्ष लिटर पाणी ठाण्याला तर उर्वरित ३७५० दशलक्ष लिटर पाणी मुंबईसाठी पाठवण्यात येते. मुंबईची लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्याआधी ५ टक्क्यांपासून २० टक्क्यांपर्यंत पाणीकपात करावी लागते. मात्र यावर्षी तलावांमध्ये पाणीसाठा पुरेसा असल्यामुळे पाणीकपातीची गरज भासणार नाही, असे पालिकेचे म्हणणे आहे. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता पुढील १६४ दिवस पाणी पुरवता येऊ शकते. सध्याचे पाणी सप्टेंबरच्या १४ तारीखेपर्यंत पुरणार असल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट टळले आहे.

Post Bottom Ad