इलेक्ट्रिक मोबिलिटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 March 2018

इलेक्ट्रिक मोबिलिटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणार - मुख्यमंत्री


मुंबई, दि. १६ : वाहतूक कोंडी व वाहनांच्या प्रदूषणावर सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर हाच उपाय असून यापुढील काळात १०० टक्के इलेक्ट्रिक मोबिलिटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून भविष्यात सर्व बसेस या इलेक्ट्रिकवर चालविल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमएमआरडीए’च्या वतीने बांद्रा कुर्ला संकुलात सुरू करण्यात आलेल्या हायब्रीड बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने चालविण्यात येणाऱ्या २५ हायब्रीड बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृहात झाला. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते प्रमुख पाहुणे होते. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, सहआयुक्त प्रवीण दराडे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, गिरीश व्यास आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनेत मुंबई व एमएमआरडीएचा समावेश केल्याबद्दल केंद्र शासन आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे आभार मानून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बांद्रा कुर्ला संकुलात मोठ्या प्रमाणात गाड्या येत असल्यामुळे वाहतूक कोंडी व प्रदूषण होत आहे. ‘एमएमआरडीए’ने उड्डाणपूल बांधून सिमलेस वाहतुकीसाठी उपाययोजना केल्या आहेत. कितीही रस्ते बांधले तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर झाल्याशिवाय ही कोंडी कमी होणार नाही. सार्वजनिक वाहतूक हाच यावरचा उपाय आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहतूक व्यवस्थेकडे जावे लागणार आहे. पुढील काळात सर्व बसेस या संपूर्ण इलेट्रिकवर आणण्यात येतील. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही इलेट्रिक मोबिलिटीवर आणण्यात येणार आहे असून त्यासाठीचे चार्जिंग धोरण तयार केले आहे. मुंबईतील ‘बेस्ट’ला सुद्धा आपल्या सर्व बस या इलेक्ट्रिक कराव्या लागणार आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल.

‘एमएमआरडीए’च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या हायब्रीड बस बांद्रा कुर्ला संकुलात येणाऱ्यांना नक्कीच आवडतील. वातानुकूलित, वायफाय सुविधा, आरामदायी अशा या बस असल्यामुळे यामधून लोकांना कामही करता येईल. या बसेसमुळे बीकेसीमध्ये येणाऱ्या गाड्याची संख्या कमी होईल. तसेच 30 ते 40 टक्के प्रदूषणसुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी या हायब्रीड बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

बेस्टसाठी आणखी ८० इलेक्ट्रिक बस देणार - अनंत गीते 
गीते म्हणाले, केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत फेमा इंडिया या विशेष योजनेतून एमएमआरडीएला या बसेससाठी अनुदान देण्यात आले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या या नाविन्यपूर्ण योजनेत सहभागी होण्यासाठी देशातून सर्वप्रथम राज्य शासन व एमएमआरडीएने तयारी दर्शविली. कोणत्याही नव्या कल्पनांना व उपक्रमांना बळ देण्याचे काम महाराष्ट्राने व मुंबईने नेहमीच केले आहे. या हायब्रीड बसमुळे ३० टक्क्यांपर्यंत प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. शून्य प्रदूषण हे उद्दिष्ट असून त्यासाठी उद्योगांना सोबत घेऊन जाण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे.मुंबईतील बेस्ट ही नावाप्रमाणेच बेस्ट असून अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘बेस्ट’ला यापूर्वी ४० इलेक्ट्रिक बस देण्यात आल्या आहेत. लवकरच ८० बस देण्यात येणार असल्याचेही गीते यांनी यावेळी सांगितले.


हायब्रीड बसची वैशिष्ट्ये - 
 31 अधिक 1 अशा आसन क्षमतेच्या एकूण 25 बसेस
चालविणाऱ्या जाणार
 बोरिवली, ठाणे, मुलुंड, खारघर ते बांद्रा कुर्ला संकुल या
मार्गावर चालणार
 सकाळी 7.30 ते 8.30 आणि सायं. 6 ते 7 या वेळेत
फेऱ्या चालणार
 तसेच बांद्रा कुर्ला संकुल परिसरात तसेच जवळच्या रेल्वे
स्थानकादरम्यान शटल सेवा
 बेस्टमार्फत ही सेवा चालविण्यात येत आहे.
 भारतातील हायब्रीड श्रेणीतील मेक इन इंडिया अंतर्गत
उत्पादित पहिली बस
 हायब्रीड तंत्रज्ञानामुळे कार्बन उत्सर्जनावर 30 टक्के बचत
 इतर बसच्या तुलनेत 28.24 टक्के इंधन बचत
 संपूर्ण इलेक्ट्रॉनिक किंवा फ्युएल सेलमध्ये परिवर्तन
करण्याची क्षमता
 संपूर्ण वातानुकुलित, टीव्ही, वायफाय, सीसीटीव्ही सुविधा
 आरामदायी आसन व्यवस्था, दिव्यांगासाठी विशेष आसन
व व्हिलचेअरसाठी उताराची व्यवस्था
 गिअरलेस व क्लचलेस कार्यपद्धती
 जीपीआरएस यंत्रणा

Post Bottom Ad