मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत भविष्यात सुमारे 65 लाख प्रवाशांना ने-आण करणा-या मेट्रोच्या कामांना वेग आला असून प्रवाशांची सुरक्षा आणि मेट्रोचे दळणवळण सुरक्षीत व्हावे म्हणून मेट्रोचे स्वतंत्र प्राधिकरण करण्यात यावे अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत आज महसुल आणि नगरविकास खात्याच्या मागण्यांवर चर्चा करताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुंबईकरांच्या अनेक महत्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. मुंबईत मेट्रोचे काम वेगाने सुरू असून भविष्यात या मेट्रोतून सुमारे 65 लाख प्रवासी प्रवास करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा महत्वाची ठरणार आहे. यासह मेट्रोचे दळणवळण सुरक्षीत व्हावे म्हणून मेट्रोचे स्वतंत्र प्राधिकरण करण्यात यावे अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. तसेच मेट्रो झालीच पाहिजे ही सर्वांची भूमिका असून बांद्रा ते जुहू ही मेट्रो (II B) अत्यंत दाटीवाटीच्या भागातून जाणार आहे त्यामुळे ही मेट्रो भूयारी करण्यात यावी अशी मागणी शेलार यांनी केली.