सरकारचे धोरण 'मुँह मे राम और बगल मे छुरी' - मायावती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 March 2018

सरकारचे धोरण 'मुँह मे राम और बगल मे छुरी' - मायावती


लखनौ - केंद्रातील सत्तारूढ भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे धोरण 'मुँह मे राम और बगल मे छुरी' असे असल्याची घणाघाती टीका करीत बसप सुप्रिमो मायावती यांनी सोमवारी बहुचर्चित सप-बसपच्या महाआघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतरसुद्धा सप-बसपतील ताळमेळ पाहता भाजपचे धाबे दणाणल्याचा दावा त्यांनी केला आहे.

यूपीची राजधानी लखनौ येथे पत्रकार परिषद घेत मायावती म्हणाल्या की, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत बसपचा उमेदवार पराभूत होण्यामुळे सप-बसपची आघाडी आणखी बळकट झाली आहे. त्यामुळे आमच्यात फूट पाडण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. भाजपला कोणत्याही स्थितीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक संयुक्तपणे लढणार आहोत. नरेंद्र मोदी केवळ बाबासाहेबांचे नाव ओठावर घेतात. मात्र, दलित समाजाची पीछेहाट करणे व त्यांचे शोषण करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे. केवळ मते मिळविण्यासाठी नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला. हे त्यांचे एक ढोंग आहे, अशा शब्दांत त्या कडाडल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजपने सत्तेचा दुरुपयोग करून धाक-दडपशाहीने बसपचे उमेदवार भीमराव आंबेडकर यांना पराभूत करण्यात आले. यातून भाजपची दलितविरोधी मानसिकता अधोरेखित होत असल्याचा आरोप मायावतींनी केला. नोटबंदी, जीएसटी आणि इतर चुकीच्या धोरणांमुळे देशभरात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच भाजपविरोधात सप-बसपने एकतेची वज्रमूठ आवळली आहे. आमच्या आघाडीमागे स्वार्थ नसून, व्यापक जनहित दडले आहे. सप-बसपच्या मनोमीलनाचे देशभरात सहर्ष स्वागत होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दलित आरक्षणाप्रमाणेच प्रदीर्घ संघर्षानंतर स्थापन झालेल्या मंडल आयोगाला भाजप सरकारने निष्क्रीय बनविल्याचा आरोप मायावतींनी केला आहे..

Post Bottom Ad