
मुंबई । प्रतिनिधी - मोठ्या सोसायट्या व आस्थापनांना कचरा वर्गीकरण करण्याचे निर्देश देऊनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या १३ सोसायट्या व आस्थापनांच्या विरोधात एमआरटीपी कायद्यानूसार 'एफआयआर' नोंदवण्यात आले आहेत. पर्यावरण संरक्षण विषयक कायद्यानुसार २८ तर मुंबई महापालिका अधिनियमानूसार ७५४ सोसायट्या व आस्थापनाच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या आढावा बैठकीदरम्यान देण्यात आली.
२० हजार चौ. मी. पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावरील गृहसंकुल, तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो अशा सोसायट्या वा उपहारगृहे इत्यादींनी त्यांच्या स्तरावर कच-या वर्गीकरण करणे तसेच ओल्या कच-यावर प्रक्रिया करुन त्यापासून खत निर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे पालिका आयुक्तांना संगणकीय सादरीकरण केले. यावेळी 'एमआरटीपी ऍक्ट' कलम ५३ (१) नुसार करण्यात १३ सोसायट्या व आस्थापना यांच्या विरोधात'एफआयआर' नोंदविण्यात आला आहे. ५० च्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ३१७ सोसायट्या व आस्थापना यांना नोटीसेस देण्यात आल्या; त्यापैकी २० बाबत मुदत वाढविण्यासाठी अर्ज प्राप्त झाले. तर ७८ सोसायट्या व आस्थापना यांनी अपेक्षित कार्यवाही पूर्ण केली. पर्यावरण संरक्षण विषयक कायद्यानुसार २२४ सोसायट्या व आस्थापना यांना नोटीसेस देण्यात आल्या, त्यापैकी ४० बाबत मुदत वाढविण्यासाठी अर्ज प्राप्त झाले. १०८ सोसायट्या व आस्थापनांनी अपेक्षित कार्यवाही पूर्ण केली. तर २८ च्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच मुंबई महापालिका अधिनियम, कलम ३६८ नुसार ३,२८३ सोसायट्या व आस्थापनांना नोटीसेस देण्यात आल्या, त्यापैकी १,२६८ संस्थांकडून मुदत वाढविण्यासाठी अर्ज प्राप्त झाले. ८१८ सोसायट्या व आस्थापनांनी अपेक्षित कार्यवाही पूर्ण केली. तर ७५४ संस्थांच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. वारंवार सूचना देऊन देखील कचरा व्यवस्थापनाबाबत सहकार्य न करणा-या सोसायटी व आस्थापना यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, असेही निर्देश बैठकी दरम्यान देण्यात आले.
अद्याप ८४५ सोसायटी व आस्थापनांवर कारवाई -
कचरा वर्गीकरण सक्तीचे केल्यापासून म्हणजेच जून २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत सुमारे ३ हजार ३०० सोसायटी व आस्थापनांपैकी १ हजार सोसायटी व आस्थापनांनी दिलेल्या नोटिशीनुसार अपेक्षित कार्यवाही करीत आपल्या स्तरावर कचरा प्रक्रिया सुरु केली. तर १ हजार ३२८ सोसायटी व आस्थापनांनी मुदत वाढीसाठी विनंती केली आहे. तर ८४५ सोसायटी व आस्थापनांवर कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.
कचरा कमी झाल्याने वाहन संख्येत घट -
कचरा कमी झाल्याने वाहन संख्येत घट -
२०१५ मध्ये दररोज सरासरी ९ हजार ५०० मेट्रीक टन एवढा कचरा बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातून उचलण्यात येत होता. महापालिकेने कचरा कमी करण्याच्या दृष्टीने राबविलेल्या उपयायोजनांमुळे कच-याचे प्रमाण सरासरी ७ हजार २०० मेट्रीक टनांपर्यंत कमी झाले आहे. दररोज सरासरी २ हजार ३०० मेट्रीक टन एवढी कचरा संकलनात घट झाली आहे. कचरा संकलनात घट झाल्यामुळे कचरा वाहून नेणा-या वाहनांची संख्या जून २०१७ तुलनेत फेब्रुवारी २०१८ मध्ये १२० वाहनांनी कमी झाली आहे. कच-याचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु असल्याने ही संख्या मे २०१८ पर्यंत आणखी ८० वाहनांनी कमी होणे अपेक्षित आहे. जून २०१७ च्या तुलनेत मे २०१८ मध्ये वाहनांच्या संख्येत सुमारे २०० वाहनांची घट होईल अशी पालिकेला अपेक्षा आहे. महापालिका क्षेत्रात संकलित होणारा कचरा वाहून नेण्यासाठी जून २०१७ मध्ये शहर भागात ७८२, पश्चिम उपनगरांमध्ये ९०६ आणि पूर्व उपनगरांमध्ये ५५०, अशी एकूण २ हजार २३८ वाहने कचरा वाहून नेत होती. सध्या ही संख्या शहर भागात ७३३, पश्चिम उपनगरांमध्ये ८५८ आणि पूर्व उपनगरांमध्ये ५२७ अशी एकूण २ हजार ११८ वाहने कचरा वाहून नेत आहेत.