मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिका इर्ला पंपिंग स्टेशनच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी नवीन कंत्राटदार नेमणार आहे. त्यासाठी पालिका तब्बल ३९ कोटी रुपये खर्चणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मुंबईत २६ जुलै २००५ रोजी ९४४ मिलिमीटर पाऊस पडला व त्याचवेळी समुद्रात मोठी भरती होती. त्यामुळे मुंबईमधील नाले तुंबले आणि मिठी नदी व अन्य नद्यांना पूर येऊन मुंबईत मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. २६ जुलै सारखी पूरस्थिती पुन्हा उदभवू नये, जीवित व वित्तीय हानी होऊ नये, यासाठी अभ्यास करण्याकरिता नेमलेल्या चितळे समितीने केलेल्या शिफारशीनुसार सात ठिकाणी पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेने इर्ला, हाजियाली, क्लिव्ह लँड, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया या ५ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारले. तर गझधरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्णत्वास येत असले तरी माहुल पंपिंग स्टेशनचे काम अद्यापही प्रलंबित आहे. पालिकेने उभारलेल्या या ५ पंपिंग स्टेशनची देखभाल व दुरुस्तीचे काम कंत्राटदारांकडून केले जाते. इर्ला पंपिंग स्टेशनच्या देखभालीचे ७ वर्षाचे कंत्राट संपुष्टात आल्याने पुन्हा नव्याने हे कंत्राट देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका ३९ कोटी रुपये खर्चणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.