मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेने सार्वजनिक शौचालयांची नोंद ‘गुगल मॅप’वर अपलोड केल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक शौचालयांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक शौचालय शोधायचं असेल तर गुगल आसपासच्या टॉयलेटचा रस्ता दाखवणार आहे, अशी माहिती पालिकेच्या एका अधिका-याने दिली.
मुंबई शहरात अनेकदा सार्वजनिक टॉयलेट कुठे आहे, याचा शोध घेणे कठीण होते. ही समस्या ही लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने सार्वजनिक टॉयलेटची माहिती गुगल मॅप’वर टाकली आहे. पालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. पालिकेने टॉयलेटच्या माहितीसाठी मोबाईल अॅप तयार केलं होतं. हे अॅप डाऊनलोड केल्याशिवाय शौचालयांची माहिती मिळतं नव्हती. कुठलंही अॅप डाऊनलोड न करता नागरिकांना टॉयलेटची माहिती मिळावी याकरता ‘गुगल मॅप’वर याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मागील ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात याचे ट्रायल घेण्यात आल्यानंतर हे गुगल मॅप सर्वांना खुले करण्यात आले असल्याची माहिती एका अधिका-याने दिली. गुगल मॅपवर ‘पब्लिक टॉयलेट’ असं सर्च केल्यास जवळच्या सार्वजनिक टॉयलेटचा मार्ग गुगल दाखवेल’’ प्रत्येक वॉर्डमधील टॉयलेट, टॉयलेटच्या बाहेरील आणि आतील फोटो यामध्ये संकलित करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून ‘राईट टू पी’च्या माध्ममातून टॉयलेटच्या मागणीसाठी संघर्ष सुरु आहे. पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ सुरू केले. पण, या अॅपमध्ये शौचालयांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. आता ही नवीन योजना सुरू केल्याने याचा फायदा महिलांना होणार आहे. मुंबईत अडीच हजार शौचालये आहेत. या सुविधेद्वारे शहरातील आसपासची स्वच्छतागृहे आता शोधण्यास मदत होणार आहे, असे ‘राईट टू पी’च्या कार्यकर्त्या मुमताज शेख यांनी सांगितले.