दोन महिन्यात १२६९ दुर्घटना, ६२ जण जखमी -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई अग्निशमन दलाकडून शहरात लागणाऱ्या आग आणि इतर दुर्घटनांची आकडेवारी माहितीसाठी स्थायी समितीत सादर केली जाते. या आकडेवारीनुसार मुंबईत सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात १२६९ दुर्घटना घडल्या. त्यात तब्बल ६२ जण जखमी झाले असून १९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
सप्टेंबरमहिन्यात १ ते १५ सप्टेंबर दरम्यान३१६ घटना घडल्या, त्यात २५ जण जखमी झाले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान ३५९ घटना घडल्या, त्यात १४ जन जखमी झाले असून ३ जणांचा मृत्यू झालं आहे. १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान २७६ दुर्घटना घडल्या, त्यात ९ जण जखमी झाले असून २ जणांचा मृत्यू झालं आहे. १५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ३१८ घटना घडल्या त्यात १४ जण झखमी झाले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबरमध्ये विलेपार्ले येथील जुहू प्रार्थना येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीला आग लागली होती. या आगीत २४ जण जखमी झाले होते. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पवई एटलांटिक इमारतीच्या लिफ्ट शाफ्टमध्ये अडकला होता. त्याला रुग्णलयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. दहिसर एन एन कॉम्प्लेक्स कोकणी पाड्यात एक इसम नाल्यात पडून मृत झाला होता. अंधेरी वि रा देसाई रोड येथील सवेरा इमारतीमध्ये अतिवृष्टीमुळे पाणीसाचून त्यात विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येऊन एकाचा मृत्यू झाला होता. सांताक्रूझ रेल्वे कंपाउंड येथील २० फूट खड्ड्यात पडून एकाच मृत्यू झाला. कुर्ला मिठी नदी मध्ये एक जण बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात मालाड पश्चिम येथील अली तलावात एक मुलाचा मृत्यू झालं आहे. अंधेरी वर्सोवा खाडीत एक कुजलेला मृतदेह काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पवई विहार लेकमध्ये दोन मुले बुडाली होती त्यापैकी एकाला स्थानिकांनी बाहेर काढले तर एका मुलाला अग्निशमन दलाने बाहेर काढले. त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. दहिसर येथे रास्ता दुभाजकाला चार चाकी गाडीने धडक दिली त्यात पाच जण जखमी झाले होते त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.