एल्गार मोर्चाच्या निमित्ताने सोमवारी मुंबईत चक्का जाम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 March 2018

एल्गार मोर्चाच्या निमित्ताने सोमवारी मुंबईत चक्का जाम


मुंबई । अजेयकुमार जाधव -
पुण्याच्या भीमा कोरेगाव येथे वीजय स्तंभाला अभिवादन करण्यास गेलेल्या आंबेडकरी जनतेवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेला जबाबदार असलेल्या संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, या मागणीकरता भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (२६ मार्च) एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळा राणीबाग येथून निघणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंबेडकरी जनतेच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागणार आहे. मोर्चा आझाद मैदानात काढला जाणार असल्याने आझाद मैदान परिसरात चक्का जाम, रास्ता रोको तसेच ठिय्या आंदोलन होणार असल्याने मुंबई ठप्प होणार आहे.

एक जानेवारीला दरवर्षी आंबेडकरी अनुयायी आपल्या पूर्वजांनी केलेल्या परक्रमाचे प्रतीक असलेल्या पुण्यातील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जातात. यावर्षी अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीनंतर याठिकाणी अनेक गाड्यांची मोडतोड करण्यात येऊन काही गाड्या जाळण्यात आल्या. याचे पडसाद तींन दिवस राज्यभर उमटले. राज्यभर झालेल्या आंदोलनापुढे सरकार नमले. सरकारने संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र गेल्या तीन महिन्यात सरकारने यांना अटक केली नव्हती. मिलिंद एकबोटे यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यावर त्यांना अटक करण्यात आली. मात्र अद्यापही संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नसल्याने एल्गार मोर्चा काढला जात आहे.

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या एल्गार मोर्चामध्ये आंबेडकरी संघटना, विद्यार्थी, कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यात आपला पसारा वाढवणारी भीम आर्मी मोर्चात सहभागी होणार आहे. बहुजन आणि मराठा समाजात लोकप्रिय असलेली संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ या संघटनाही मोर्चात सहभागी होणार आहे. ओबीसी समाजातील अनेक संघटना सहभागी होणार आहेत. राज्यातील बहुजन चळवळीत काम करणारे कार्यकर्तेतसेच आंबेडकरी नागरिक या मोर्चात हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यभरातून हजारो लोक ट्रेन, व गाड्यामधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. या हजारो लोकांच्या रोषाला आणि संतापला सरकारला सामोरे जावे लागणार आहे.

भायखळा राणीबाग ते आझाद मैदान असा एल्गार मोर्चा निघणार होता. ऐनवेळी पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. भायखळा येथून मोर्चा न काढता आझाद मैदानात मोर्चा काढावा अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. राणीबाग येथून शांततेच्या मार्गाने निघणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. प्रकाश आंबेडकर यांचे याआधी निघालेले मोर्चे पाहता एल्गार मोर्चातही हजारो लोक सामील होतील अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

गोधळ झाल्यास सरकारची जबाबदारी - प्रकाश आंबेडकर 
एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना आम्ही भायखळा येथून शांततेच्या मार्गाने मोर्चा घेऊन येणार होतो. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मोर्चा काढल्यास गोंधळ होऊ शकतो अशी शक्यता आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. १० वी, १२ वीच्या परिक्षा संपल्या आहेत. त्यामुळे सरकारने त्याचे कारण देऊ नये असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मोर्चा काढण्याचा आम्हाला ३० वर्षाचा अनुभव आहे. सरकार आमचा हक्क डावलत आहे. राज्य सरकारने संभाजी भिडेला आज रात्री अटक केल्यास सोमवारचा मोर्चा रद्द करू असे आव्हान आंबेडकर यांनी सरकारला दिले आहे.

Post Bottom Ad