मुख्यमंत्र्यांकडून अर्थमंत्र्यांचे अभिनंदन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 March 2018

मुख्यमंत्र्यांकडून अर्थमंत्र्यांचे अभिनंदन


प्रगतीशील, सर्वसमावेशक सर्वजनहिताय अर्थसंकल्पातून वंचित-दिव्यांगांचा विकास
मुंबई, दि. 9 : राज्य विधानमंडळात आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून राज्यातील वंचित, उपेक्षित आणि दिव्यांग जनतेच्या विकासासह कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. खऱ्या अर्थाने सर्वजनहिताय असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली असून प्रगतीशील आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याच्या या अर्थसंकल्पात आदिवासी, दलित, दिव्यांग यासारख्या वंचित-उपेक्षित समाजाला मुख्य धारेत आणण्यासाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भरीव निधी देऊन गरिबांसाठीच्या गृहनिर्मितीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अर्थसंकल्पातून बळकटी मिळाली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, विविध योजनांच्या माध्यमातून यंदाच्या अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तुलनात्मकरित्या कित्येक पटींनी जास्त निधी देण्यात आला आहे. सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी योजना जाहीर करून इज ऑफ डुईंग बिझनेसद्वारे रोजगाराला चालना मिळाली आहे. छोट्या शहरांच्या विकासासह ग्रामीण व रस्त्यांच्या निर्मिती आणि पायाभूत सुविधांसाठीही तरतुदी केल्या आहेत. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील अंतर कमी झाले असून सेवाक्षेत्रातून सर्वाधिक रोजगार निर्मिती होत आहे. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून केलेली भरीव तरतूद स्वागतार्ह असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad