मुंबई, दि. २३ : ज्या ज्या देशात बुलेट ट्रेनचे प्रकल्प झाले आहेत, तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ झाली आहे. प्रस्तावित मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या माध्यमातून सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ होणार असून हा प्रकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
सदस्य संजय दत्त यांनी मुंबई अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन विषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. दळणवळण व्यवस्था (मोबिलिटी) हा विकासाचा मार्ग आहे. जिथे जिथे फास्ट ट्रेन गेली आहे, तेथील विकासदरात वाढ झाली आहे. याच दृष्टीने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जपान सरकार कर्ज देणार आहे. 50 वर्षांसाठी जपान सरकारने अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी दराने बुलेट ट्रेनसाठी कर्ज दिले आहे. सुरुवातीची 20 वर्षे कुठलीही व्याज द्यावे लागणार नाही. भविष्यात मुंबई- पुणे व राज्यातील इतर ठिकाणीही बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतल्या लोकलसाठी पाहिल्यांदाच अर्थसंकल्पात 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षा उपाययोजना यासाठी हे पैसे देण्यात आले आहेत. बुलेट ट्रेनचे तिकीट हे रेल्वे तिकीटाएवढेच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुंबईत आर्थिक केंद्र होणार आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईत आर्थिक केंद्र होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत राहुल नार्वेकर, भाई जगताप यांनी भाग घेतला.