आज पालिका यंत्रणा होणार ठप्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 March 2018

आज पालिका यंत्रणा होणार ठप्प


हजारो कर्मचारी उतरणार रस्त्यावर -
मुंबई । प्रतिनिधी - बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतला गोंधळ, मागील आठ महिन्यांपासून बंद पडलेली गटविमा योजना आदी मागण्यांसाठी पालिकेतील सर्व विभागातील कर्मचा-यांनी आज (सोमवारी) रस्त्यावर उतरण्याचा निर्णय़ घेतला आहे. सुमारे एक लाख कर्मचारी रस्त्यावर उतरणार असल्याने पालिका ठप्प होणार आहे. पाणी खाते, आरोग्य सेवेतील कर्मचारी या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही आंदोलनात उतरणार असल्याने या सेवांवर याचा परिणाम होणार आहे. महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे. 

मागील काही महिन्यांपासून बायोमेट्रिक हजेरीत गोंधळ सुरु असून कामावर हजर असतानाही अनेकांची गैरहजेरी लागून पगार कापला जातो आहे. बायोमेट्रिक हजेरी नोंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या मशीन्स बोगस आहेत. मशीन्स खरेदीत डील झाले आहे असा आरोप समन्वय समितीचे सुखदेव काशिद यांनी पत्रकार परिषदेत केला. बायोमेट्रिक मशिन्स हँग होणे, एकाच्या कार्डावर दुस-याचा फोटो असे प्रकार सर्रास होत आहेत. या त्रूटी प्रशासनाच्या लक्षात आणूनही त्याकडे दुर्लक्ष आहे. नोव्हेंबर 2017 पासून सदोष बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती घेतली जात असल्याने शेकडो कामगार, कर्मचा-यांचे वेतन कापून घेतले जाते आहे. बायोमेट्रिक पध्दतीने उपस्थिती मधील त्रूटी दूर कराव्यात अन्यथा ही पध्दतच बंद करावी अशी मागणी समितीने केली आहे. मागील वर्षीच्या 1 ऑगस्ट 2015 पासून कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वार्षिक पाच लाखाची तरतूद असलेली वैद्यकीय गट विमा योजना लागू करण्यात आली होती. मात्र ही योजना 1 ऑगस्ट 2017 पासून ही योजना बंद पडली आहे. या योजनेसाठी आजही प्रत्येक कर्मचा-यांच्या पगारातून दरमहा 200 रुपये व सेवानिवृत्ती वेतनातून मासिक 640 रुपये कापून घेतले जात आहेत. मात्र ही योजना बंद पडल्यापासून कर्मचा-यांना अनेक कर्मचा-यांनी बाह्य रुग्णालयातून औषधोपचार, शस्त्रक्रिया करून घेतली घेतली आहे. अशा कर्मचा-यांना स्वतःच्या खिशातून बिलाची रक्कम द्यावी लागल्याने कर्जबाजारी व्हावे लागले आहे. महापालिकेने ही रक्कम विनाविलंब द्यावी अशी मागणीही समन्वय समितीने केली आहे. याशिवाय इतर महत्वाच्या मागण्या तडीस नेण्यासाठी मोर्चाव्दारे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल असे समन्वय समितीचे साईनाथ राजाध्यक्ष, प्रकाश देवदास यांनी सांगितले.

आरोग्य सेवांवर होणार परिणाम -
कर्मचा-यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कर्मचा-यांनी यल्गार पुकारला आहे. यांत आरोग्यसेवेतील परिचारिका, परिसेविका, तंत्रज्ञ तसेच पाणी खात्यातील कर्मचारी, सफाई कामगार या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांनीही आंदोलनात उतरण्याचा निर्णय़ घेतल्याने या सेवा ठप्प होणार आहेत.

असा निघणार मोर्चा -
कर्मचारी आपआपल्या कामाच्या ठिकाणापासून मोर्चाने आझाद मैदानावर उपस्थित राहून पालिकेवर धडक देणार आहेत. सर्व खात्यातील कर्मचारी - अधिकारी मोठ्या संख्येने रस्त्य़ावर उतरणार असल्याने मुंबईतल्या रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कामगार संघटनांच्या समन्वय समितीने मोर्चा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी केली असल्याचे समितीच्या पदाधिका-यांनी सांगितले.

Post Bottom Ad