मुंबई । प्रतिनिधी - दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना मुंबई महानगर पालिकेच्या शाळेतील सभागृह तसेच शाळेचे पटांगण वापरताना घेण्यात येणा-या भाड्यात महापालिकेकडून सवलत मिळणार आहे. पालिका सभागृहात मांडण्यात आलेल्या ठरावाच्या सूचनेला मंजुरी मिळाली आहे. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर याबाबतची अममलबजावणी केली जाणार आहे.
उन्हाळी व दिवाळीची सुट्टी आणि रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पालिकेच्या शाळेतील सभागृह तसेच शाळेचे पटांगण दिव्यांगांसाठी काम करण्याऱ्या संस्थांना भाड्यामध्ये सवलत द्यावी अशी मागणी भाजपच्या नगरसेविका सुनीता यादव यांनी ठरावाच्या सुचनेव्दारे केली होती. त्याला सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या शाळेतील सभागृह आणि पटांगण उन्हाळी व दिवाळीची सुट्टी आणि रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लग्न समारंभ, साखरपुडा ,मुंज यासारख्या विविध कार्यक्रमासाठी भाड्याने दिले जाते. खाजगी सभागृहापेक्षा भाडे कमी असल्यामुळे गरीब नागरिक या सभागृहांना प्राधान्य देतात. पालिकेलाही त्यापासून महसूल मिळतो. मुंबई महानगर पालिकेच्या शाळेतील सभागृह आणि पटांगणामध्ये दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था विविध प्रकारचे मार्गर्शनपर कार्यक्रम आयोजित करतात. पालिका अशा संस्थांनाही नियमित शुल्क आकारते. अशा संस्थाना शुल्कामध्ये जर सवलत मिळाली तर सर्व व्यक्तीसाठी जास्तीतजास्त कार्यक्रम आयोजित केले जातील. त्याचा फायदा दिव्यांग व्यक्तींना होईल, असे ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.