मुंबई । प्रतिनिधी - बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतला गोंधळ, मागील आठ महिन्यांपासून बंद पडलेली गटविमा योजना आदी मागण्यांसाठी पालिकेतील सर्व विभागातील कर्मचा-यांनी आज महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात मोर्चा काढला. आझाद मैदानात प्रकाश आंबेडकर यांनी काढलेल्या एल्गार मोर्चामुळे पालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा फिका पडल्याचे दिसत होते.
महापालिकेत मागील काही महिन्यांपासून बायोमेट्रिक हजेरीत गोंधळ सुरु असून कामावर हजर असतानाही अनेकांची गैरहजेरी लागून पगार कापला जातो आहे. बायोमेट्रिक हजेरी नोंद करण्यासाठी लावण्यात आलेल्या मशीन्स बोगस आहेत. मशीन्स खरेदीत डील झाले आहे असा आरोप समन्वय समितीकडून करण्यात आला आहे. बायोमेट्रिक मशिन्स हँग होणे, एकाच्या कार्डावर दुस-याचा फोटो असे प्रकार सर्रास होत आहेत. या त्रूटी प्रशासनाच्या लक्षात आणूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नोव्हेंबर 2017 पासून सदोष बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती घेतली जात असल्याने शेकडो कामगार, कर्मचा-यांचे वेतन कापून घेतले जाते आहे. बायोमेट्रिक पध्दतीने उपस्थितीमधील त्रूटी दूर कराव्यात अन्यथा ही पध्दतच बंद करावी अशी मागणी समितीची आहे. मागील वर्षीच्या 1 ऑगस्ट 2015 पासून कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वार्षिक पाच लाखाची तरतूद असलेली वैद्यकीय गट विमा योजना लागू करण्यात आली होती. मात्र ही योजना 1 ऑगस्ट 2017 पासून ही योजना बंद पडली आहे. या योजनेसाठी आजही प्रत्येक कर्मचा-यांच्या पगारातून दरमहा 200 रुपये व सेवानिवृत्ती वेतनातून मासिक 640 रुपये कापून घेतले जात आहेत. मात्र ही योजना बंद पडल्यापासून कर्मचा-यांना अनेक कर्मचा-यांनी बाह्य रुग्णालयातून औषधोपचार, शस्त्रक्रिया करून घेतली घेतली आहे. अशा कर्मचा-यांना स्वतःच्या खिशातून बिलाची रक्कम द्यावी लागल्याने कर्जबाजारी व्हावे लागले आहे. महापालिकेने ही रक्कम विनाविलंब द्यावी अशी मागणीही समन्वय समितीची आहे. या व अश्या अनेक मागण्यांसाठी समन्वय समितीने आझाद मैदानात मोर्चा काढला.