मुंबई - मुंबई महापालिकेचा सन 2018-19 या वर्षीच्या 27 हजार 258 कोटी रुपयांचा व सात कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंजुरी नंतर हा अर्थसंकल्प पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाला आज (सोमवारी,19 मार्च रोजी) पालिका सभागृहाची मंजूरी मिळणार आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटी रुपये फुगला होता. २०१७ -१८ असून वास्तववादी अर्थसंकल्प सादर करत २५ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात २०१८ -१९ मध्ये वाढ होऊन 27 हजार 258 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यात कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड तसेच काही मोठ्या विकास प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाला मंजूरी मिळाल्यानंतर 1 एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.
स्थायी समितीने 23 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजूरी दिली होती. त्यानंतर पालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीत विकास प्रकल्पांच्या निधीत 550 कोटी रुपयांची फेरबदल करण्यात आला. अर्थसंसकल्पीय तरतूदीतून नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी इतका विकास निधीची तरतूदही करण्यात आली. कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड तसेच काही मोठ्या विकास प्रकल्पांसाठी तरतूद केली आहे.
पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीच्या बैठकीत 2 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर समितीत अर्थसंकल्पावर चर्चा झाली. अर्थसंकल्प सादर झाल्यांनंतर स्थायी समितीच्या अनौपचारिक बैठकीत सर्वपक्षीय गटनेते आणि नगरसेवक यांनी आपल्या सूचना मांडल्या. अर्थसंकल्पातील निधी कसा, कुठे आणि किती वापरावा, याबाबतही गटनेत्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर 3 मार्च रोजी अर्थसंकल्प पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मागील काही दिवसांपासून यातील तरतुदींवर चर्चा सुरू आहे.
119 नगरसेवकांचा चर्चेत सहभाग -
12 मार्चपासून पालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरूवात झाली. आतापर्यंत अर्थसंकल्पावर 49 नगरसेवकांची भाषणे झाली आहेत. उर्वरित 70 नगरसेवकांची भाषणे होवून आज (सोमवारी) रात्री उशीरापर्यंत अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल.