मुंबई । प्रतिनिधी - पवई तलावाजवळील १४ भूखंड विविध संस्था आणि कंपन्यांना लिजवर देण्यात आले होते. त्यापैकी गेले ६० वर्षे मेसर्स रेमंड कंपनीकडे असलेल्या भूखंडाचे लीज नुतनीकरण करण्याच्या प्रस्तावाला सुधार समितीत सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे 1958 पासून लिजवर असलेली ही मालमत्ता पालिका आपल्या ताब्यात घेणार आहे.
पवई तलावा लगत पालिकेच्या जलविभागाच्या अखत्यारित असलेले 14 भूभाग पालिकेने विविध संस्था, व्यक्तींना लीजवर देण्यात आले होते. या मालमत्तांचे लिज कधीच संपली आहे. नव्या धोरणानुसार पालिकेने या लिज मालमत्तांच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव बुधवारी सुधार समितीत मंजुरीसाठी सादर केले होते. यापैकी 16,734 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूभाग मेसर्स रेमंड लि. यांना ही मालमत्ता 1958 ते 1976 पर्यंत पिकनिक कॉटेज करीता प्रतीवर्षी 1 हजार 572 रुपये भुईभाडे मक्त्याने पालिकेने दिली होती. या लिजची मुदत कधीच संपली असल्याने या मालमत्तेचे नुतनीकरण करून पुन्हा रेमंडला लिजवर देण्याचा प्रस्ताव पालिकेचा होता. मात्र या प्रस्तावाला शिवसेनेसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. ही मालमत्ता पुन्हा रेमंड कंपनीला लिजवर न देता पालिकेने ताब्यात घ्यावी अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली. त्यामुळे पुन्हा रेमंडला ही मालमत्ता लिजवर न देता पालिकेने ताबा घ्यावा असा निर्णय़ अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी जाहीर केला. त्यामुळे मागील सुमारे 60 वर्ष लिजवर असलेली ही मालमत्ता आता पालिकेच्या ताब्यात येणार असल्याचे नर यांनी सांगितले.