पालिका कर्मचाऱ्यांचा २६ मार्चला इशारा मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2018

पालिका कर्मचाऱ्यांचा २६ मार्चला इशारा मोर्चा


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी २६ मार्चला पालिका मुख्यालयावर इशारा मोर्चा काढणार आहेत. पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कामगार संघटना यांनी मिळून निर्माण केलेल्या मुंबई महापालिका कामगार, कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने या इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये पालिकेतील अभियंते, शिक्षक, सफाई कर्मचारी, नर्स, तंत्रज्ञ, कंत्राटी कर्मचारी आदी सहभागी होणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.

मुंबई महापालिकेने नोव्हेंबर २०१७ पासून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी पद्धत लागू केलेली आहे. या पद्धतीमधील गंभीर त्रुटींमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे बायोमेट्रिक पद्धतीत त्वरित सुधारणा करून कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे अशी कर्मचारी संघटनेची प्रमुख मागणी आहे. कर्मचाऱ्यासांठी १ ऑगस्ट २०१५ पासून आरोग्य गट विमा योजना लागू केली होती. ही योजना प्रशासनाने १ ऑगस्ट २०१७ पासून अचानक बंद केली आहे. योजना बंद असली तरी कर्मचाऱ्यांच्या पगारातून आजही विम्यासाठी रक्कम कापून घेतली जात आहे. योजना बंद असल्याने कर्मचारी व अधिकारी यांना नाहक लहान मोठ्या आजारांसाठी बाहेरून महागड्या दराने औषध उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे बंद केलेली विमा योजना पुन्हा सुरू करावी, या योजनेत कर्मचाऱ्यांच्या आईवडिलांचा समावेश करावा. जुन्या वेतन करारातील थकबाकी कर्मचाऱ्यांना त्वरित दयावी, नवीन वेतन करारासाठी त्वरित वाटाघाटी सुरू करण्यात. रस्ते सफाईसाठी यांत्रिक झाडू पद्धत बंद करावी, विविध खात्यातील हजारो रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, भरतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, पालिकेतील सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना व आश्रय योजनेमार्फत मालकी हक्काची घरे देण्यात यावीत, इत्यादी मागण्यांसाठी येत्या सोमवारी २६ मार्चला पालिका मुख्यालयावर हजारो कर्मचारी धडक देणार आहेत. या ईशारा मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते बाबा कदम, सुखदेव काशिद, साईनाथ राजाध्यक्ष, सत्यवान जावकर, दिवाकर दळवी, के.पी. नाईक, ऍड. महाबळ शेट्टी, ऍड. प्रकाश देवदास, रमेश जोशी, बा. शी. साळवी, सूर्यकांत पेडणेकर, सुभाष पवार आदि कामगार नेते करणार आहेत. या मोर्चात विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Post Bottom Ad