मुंबई | प्रतिनिधी -
वांद्रे पाली हिल येथील भूखंड शिव विद्या प्रबोधनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकेडमीला देखभाल तत्वावर देण्याच्या प्रस्तावाला सुधार समितीने मंजुरी दिली आहे. पाच वर्षाकरिता हा भूखंड दिला जाणार असून भविष्यात चांगले सनदी अधिकारी घडतील, असा दावा पालिकेने केला आहे.
मुंबईत आयएएस, आयईएस, आयपीएस व आयआरएस या सारख्या स्पर्धात्मक परिक्षांचे विनाशुल्क प्रशिक्षण घेण्याचे काम शिव विद्या प्रबोधनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकेडमी मागील १६ वर्षांपासून करत आहे. महाराष्ट्रातून वर्षाला सुमारे एक हजार विद्यार्थी येथून प्रशिक्षण घेतात, असा संस्थेचा दावा आहे. सन २०१६-१७ पासून संस्थेने महापालिकेच्या ४०० शाळांतील ८ वी, ९ वी, १० वीच्या विद्यार्थ्यांना व्हर्च्यूअल क्लासरुमच्या माध्यमातून वर्षभर स्पर्धा परिक्षांचे विनामुल्य मार्गदर्शन दिले. प्रतिवर्षी मुलांना स्पर्धापरिक्षांचे धडे देण्याचा पालिकेचा मानस आहे. मात्र, मुलांच्या तुलनेत संस्थेला जागा अपूरी पडत आहे. त्यामुळे पाली हिल येथील इबिलिक्स इमारतीमधील कल्याण केंद्राची जागा संस्थेला मिळावी, अशी मागणी केली आली होती. पालिकेने या मागणीची दखल घेत, वांद्रे पाली हिल येथील सीटीएस प्लॉट नं सी/ १६२९ अ१/२ असा ४६२.५२ चौरस मीटर समाजकल्याण केंद्राकरिता आरक्षित असलेला भूखंड शिव विद्या प्रबोधनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकेडमीला देखभाल तत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता ३९ अटी व शर्ती घालण्यात आल्या असून बुधवारी सुधार समितीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.