मुंबई । प्रतिनिधी - उन्हाळ्याच्या दिवसांत रक्ताची कमतरता भासू नये यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने रेल्वे स्थानक परिसरातील सर्व रक्तपेढ्यांना रक्तदान शिबीरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार खाजगी आणि सरकारी रक्तपेढ्यांमार्फत रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरे भरवण्यात येणार आहेत. इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी हे शिबीर भरवण्यात येतील. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकावर ही रक्तदान शिबीर भरवली जातील.
“एप्रिल आणि मे या कालावधीत दरवर्षी रक्ताची कमतरता भासते. रेल्वे स्थानकात रक्तदान शिबिर भरण्यासाठी रेल्वेच्या विभागीय सचिवांच्या परवानगीनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सर्व सरकारी आणि खासगी रक्तपेढ्या शिबिर भरवणार आहेत. रक्ताचा तुटवडा भरून काढणं हा यामागील मुख्य उद्देश आहे.” दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांना गरजेनुसार रक्तदान शिबीर आयोजित करुन रक्त साठवणूक करण्यासं सांगितलंय. उन्हाळ्यापूर्वी रक्ताचा तुटवडा लक्षात घेता एसबीटीसीने रेल्वे प्रशासनाच्या मदतीने मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकावर रक्तदान शिबिर भरवण्याचा निर्णय घेतताय. त्यानुसार सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांना नोटीस पाठवून सूचना देण्यात आल्यात.