मुंबई | प्रतिनिधी - बेस्ट उपक्रमात ९० टक्के मराठी माणूसच नोकरी करत आहे. मात्र मराठी माणसांच्या मुळावर शिवसेना उठली आहे. शिवसेनेचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. शिवसेनेमुळेच मराठी माणूस नोकऱ्यांना मुकणार आहे. परंतु समर्थ बेस्ट कामगार संघटना ही सदैव कामगारांसाठी लढा देणारी संघटना असून संघटनेला एकदा मान्यता प्राप्त करुन द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे संस्थापक नारायण राणे यांनी बेस्ट कामगारांना केले.
बेस्ट उपक्रमातील निवृत्त कर्मचारी व बेस्ट समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस संभाजी चव्हाण यांचा सत्कार नारायणराव राणे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी राणे बोलत होते. यावेळी निलमताई नारायण राणे, बेस्ट समर्थ कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष आमदार कालिदास कोळंबकर, माजी नगरसेवक सुनील मोरे, संघटनेचे खनिजदार विठ्ल गवस, राजेश हाटले तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.