मुंबई - महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाचे समाधान न करणारा आणि अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प सादर करण्यात आला अशी टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना केली.
अर्थमंत्र्यांनी २०१८-१९चा अर्थसंकल्प सादर केला. आम्हीही १५ वर्ष आघाडीचे सरकार असताना जयंतराव पाटील, सुनिल तटकरे, दिलीप वळसेपाटील आणि मी अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र आजचा अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक होता. असा अर्थसंकल्प मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही आणि ऐकलाही नाही. प्रत्येक बाबतीत गरजेपुरती रक्कम देवू, जेवढी गरज असेल तेवढीच देवू असंच सांगण्यात आले. आजचा अर्थसंकल्प दोन तास चालला. असं कधी झाले नाही. दोन वाजता सुरु झाला अर्थसंकल्प आणि चार वाजता संपला. यामध्ये कुठेही शेतकऱ्याला काहीही दाखवता आले नाही. किंवा देण्यात आलेले नाही. महिलांबद्दल किंवा बेरोजगारी कमी करण्याबद्दल कोणाताही ठोस निर्णय अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळाला नाही असेही दादा म्हणाले. अर्थसंकल्प सादर करताना निराशावादी वातावरण होते त्या वातावरणामध्ये बदल करावा म्हणून अर्थमंत्र्यांनी शेरोशायरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाचा टोला लगावला.
हा अर्थसंकल्प ऐकल्यावर असं लक्षात येते की, निवडणूका जवळ आल्या आहेत की काय. वेगवेगळया पध्दतीने जे राष्ट्रीय महापुरुष होवून गेले त्यांच्या स्मारकांबद्दल तरतुद करु असे सांगितले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल ३०० कोटी रुपये जाहीर केले. वास्तविक साडेतीन हजार कोटींचा प्रोजेक्ट आहे. आम्ही त्यांना म्हटलंही की, नुसती गाजरं दाखवण्याचा प्रयत्न करु नका काहीतरी ठोस राज्याला दया. परंतु शब्दांची किंवा आकडयांची आकडेफेक केली गेली असा आरोपही अजित पवार यांनी केला.
साधारणपणे आपल्या राज्यात पगारावरील खर्च, निवृत्ती वेतनावरील खर्च, घेतलेल्या कर्जाचे व्याज देण्याचा खर्च हा सगळा खर्च परत देण्यासाठी साधारणपणे साडे सत्तावन्न टक्के रक्कम लागते. ५७.५० टक्के रक्कम पगाराकरीता, वेतनाकरीता, कर्जावरील व्याज देण्याकरीता लागते. म्हणजे यांच्याकडे साडे बेचाळीस टक्के रक्कम शिल्लक राहते. आम्ही त्यांना प्लॅन-नॉनप्लॅन विचारलं तर ते म्हणाले आम्ही हे काढून टाकलं आहे. सगळं एकच केलं आहे.
मेट्रोची, समृध्दीची कामे सुरु आहेत, नवी मुंबई विमानतळाचे काम ही घेतले आहे. हे जे काही प्रकल्प आहेत ते अगोदरच सुरु आहेत. त्याच प्रकल्पाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला परंतु नंतरच्यावेळी जवळपास १५ हजार कोटी रुपयांच्या त्रुटीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यांच्याकडे तेवढी रक्कम येवू शकणार नाही. शेवटी शेवटी त्यांनी सांगितले की, ४५ हजार कोटी रुपये फेब्रुवारी अखेर जीएसटीची रक्कम जमा झाली. अर्थातच ३१ मार्चलाच हे सगळे चित्र स्पष्ट होईल असेही अजित पवार म्हणाले.