गॅस गळतीमुळे सिटी किनारा हॉटेलला आग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 January 2018

गॅस गळतीमुळे सिटी किनारा हॉटेलला आग


दोन अधिकाऱयांवर फक्त दंडात्मक कारवाई -
मुंबई । प्रतिनिधी - कुर्ला येथील सिटी किनारा हॉटेलमध्ये १६ ऑक्टोबर २०१५ ला लागलेल्या भीषण आगीमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला होता. यात सात विद्यार्थी व एका महिलेचा समावेश होता. या दुर्घटनेत हे सर्व गंभीररित्या भाजल्याने ते मृत पावले होते. या दुर्घटनेबाबत अडीच वर्षानी पालिका प्रशासनाने स्थायी समितीला थोडक्यात अहवाल सादर केला. या अहवालात ही दुर्घटना या रेस्टोरंटच्या (तळ अधिक १ मजला) बाल्कनीत ठेवलेल्या एच.पी.सी.एल.गॅस सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने व या गॅसचा अज्ञात आगीशी संबंध आल्याने घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

सिटी किनारा हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत हॉटेल व तेथील सामान जाळून खाक झाले होते. तसेच आठ जणांचा मृत्यू झाला होता. या आगीचा अहवाल कधी येणार याबाबत गेले अडीच वर्ष प्रश्न उपस्थित केले जात होते. किनारा हॉटेल नंतर याच विभागातील भानु फरसाणला आग लागली होती. या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला होता. भानु फरसाण आगीच्या अहवालाबरोबरच सिटी किनार हॉटेलच्या आगीचा अहवालाबाबतचे निवेदन स्थायी समितीत सादर करण्यात आले. या निवेदनानुसार सिटी किनारा आगीची कुर्ला विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फ़त चौकशी करण्यात आली. या चौकशीत स्वच्छता निरीक्षक विनोद चव्हाण व दीपक भुरके यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी ७० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुकादम तुळशी वाघवळे व कनिष्ठ अभियंता राजेंद्र राठोड यांना आधी दोषी ठरवले असताना नंतर मात्र त्यांना क्लिन चिट देत निर्दोष सोडण्यात आले आहे. गॅस पुरवठादार एच.पी.सी.एल.गॅस कंपनीचे वितरकाविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पालिकेने या घटनेनंतर, मुंबईतील १६११ हॉटेलांची तपासणी करून गंभीर त्रुटी असलेल्या परवाना धारक ३९१ हॉटेलांच्या विरोधात खटले दाखल केले. ३४३ हॉटेल विरोधात जप्तीची कारवाई करण्यात आली. परवाना नसलेल्या २४६ हॉटेलांच्या विरोधातही खटले दाखल करण्यात आले असून ३९४ हॉटेल विरोधात जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Post Bottom Ad