मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात लाउडस्पीकर्स आणि डीजेचा द्वारे केला जाणारा गोंगाट बंद करावा अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे. महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य राखणे, तसेच आंबेडकरी अनुयायांना होणारा ध्वनीप्रदूषणाचा त्रास दूर व्हावा या उद्देशाने विविध संघटनांनी ही मागणी केली आहे. सीडी विक्रेते, तसेच डीजेंवर कठोर कारवाई न झाल्यास आंबेडकरी जनता स्वयंस्फू्र्तीने हा गोंगाट बंद पाडेल असा इशाराही या संघटनांनी दिला आहे.
दरवर्षी ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देश-विदेशातील लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. वयोवृद्ध अनुयायांपासून ते अगदी नवजात बालकांसह माता-भगिनी या ठिकाणी येतात. मात्र भीमगीतांच्या सीडी विकणाऱ्या स्टॉल्सवरील लाउडस्पीकर्सच्या गोंगाटाने या दिवसाचे गांभीर्य राखले जात नाही. अनेकांना या ध्वनिप्रदूषणामुळे त्रासही होतो. पुस्तक खरेदीसाठी आलेल्यांनाही या गोंगाटाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो, असे या संघटनांचे म्हणणे आहे.
चैत्यभूमी परिसरातील ध्वनीप्रदूषण दूर व्हावे यासाठी या संघटना गेल्या ४ वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. हा गोंगाट कमी करण्यासाठी सोशल मीडियावर यंदा जोरदार कॅम्पेनिंग सुरू करण्यात आले आहे. आपल्या या प्रयत्नांना यश मिळावे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून या संघटनानी बैठकांचे आयोजन करून याबाबतचा ठराव केला. त्यानंतर या संघटनांच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनी पालिका आणि पोलीस प्रशासनाला या संदर्भात निवेदन देत ही मागणी केली आहे. महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आयोजित केलेल्या शासकीय बैठकीत हा विषय मांडण्यात आल्याचेही या संघटनांनी सांगितले आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाने चैत्यभूमी, तसेच शिवाजी पार्क परिसरातील लाउडस्पीकर्स जप्त करावेत अशी मागणीच या संघटनांनी केली आहे.