मुंबई । प्रतिनिधी - मुंबईकर नागरिकांच्या धकाधकीच्या जिवनात शारिरीक तंदुरुस्तीसाठी व प्रदुषणमुक्त मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सायकलसाठी सुरु केलेली स्वतंत्र मार्गिका अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने फक्त रविवारी सायकलसाठी एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह) ते वरळी सी फेस ही ११. ५ किेलोमीटरची स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली आहे. निमंत्रितासाठी प्रथम टप्यामध्ये एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह ) ते गिरगाव चौपाटी या पाच कि.मी. रस्त्यावर सायकलसाठी स्वतंत्र मार्गिकेचा शुभारंभ रविवारी सकाळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर बोलत होते. मुंबईकर नागरिकांचा प्रतिसाद बघून पुढील काळात ही मार्गिका नियमीत करायची का ? ते निश्चित करु असेही महापौरांनी सांगितले.
याप्रसंगी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, महापालिका आयुक्तं अजोय मेहता, मुंबई पोलिस आयुक्त दतात्रय पडसलगीकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए.एल. जऱहाड, उप आयुक्त ( महापालिका आयुक्त) रमेश पवार, ‘ ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे उपस्थित होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रसारमाध्यधमांशी संवाद साधताना म्हणाले की, बृहन्मुंबई महापालिकेने तातडीने ही मार्गिका सुरु केल्या्बद्दल त्यांनी महापालिकेला धन्यवाद दिले. मुंबई पोलिसांचे सहकार्य यापुढेही असेच मिळेल असा विश्वास व्यक्त करुन सायकल चालविणे ही मुंबईकर नागरिकांची लोकचळवळ व्हावी, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. महापालिका आयुक्त अजोय मेहता प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना म्हणाले की, मुंबईकर नागरिकांचा आज मिळालेला प्रतिसाद उत्तम असून यापुढील काळात पूर्व व पश्चिम उपनगरात लवकरच सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका सुरु करु तसेच यामध्ये आणखी काही सुधारणा करता येईल का ? याचा विचार करुन चांगल्या सुधारणा करण्याचा निश्चित प्रयत्न करु असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई पोलिस आयुक्त दतात्रय पडसलगीकर यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, सायकलसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र मार्गिकेच्या सुरक्षिततेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करु तसेच वाहतूकीची शिस्त सांभाळण्याचा निश्चिंत प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.
रविवारपासून नागरिकांसाठी ११.५ किेलोमीटरची ही मार्गिका विनाशुल्क खुली होणार असून नागरिक याठिकाणी आपली स्वतःची सायकल आणून चालवू शकता तसेच शंभर रुपये तासाप्रमाणे याठिकाणी सायकल चालविण्यासाठी सुध्दा उपलब्ध होणार आहे. ज्या हौशी नागरिकांना सायकल चालविण्याचा आनंद लुटायचा असेल त्यांनी दर रविवारी सहभागी होऊन सायकलसाठी तयार करण्यात आलेल्या या स्वतंत्र मार्गिकेचा आनंद लुटावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.