मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेत बलाढ्य अश्या म्युनिसिपल मजदूर युनियनमधील दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे चिरंजीव शशांक राव, महाबळ शेट्टी व संघटनेचे अध्यक्ष सुखदेव काशीद यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. यामधून शशांक राव यांची युनियन मधून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आता शशांक राव यांनी नाईलाजाने "द म्युनिसिपल युनियन" या नवीन युनियनची स्थापना केली आहे.
युनियनच्या नावाची घोषणा परळ येथील डॉ. शिरोडकर हॉल येथे पार पडलेल्या कामगार मेळाव्यात करण्यात आली. दिवंगत शरद राव यांच्या पत्नी शांता राव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन नवीन युनियनचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विश्वास उटगी व इतर कामगार संघटनांचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. म्युनिसिपल मजदूर युनियन मधील वाद विकोपाला पोहोचल्यामुळे कामगार आणि कर्मचारी यांत संभ्रम निर्माण झाला होता. अनेक कामगार शशांक राव यांच्याकडे गेले आणि त्यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, नव्या युनियनची स्थापना करा अशी मागणी केली होती. कामगारांनी केलेल्या आवाहनानंतर "द म्युनिसिपल युनियन" या नव्या युनियनची स्थापना करण्यात आली.