मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत पावसाळया दरम्यान पाणी साचण्याच्या घटना घडतात. यावर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईत पाणी साचल्यावर त्याचा परिणाम वाहतुकीवरही होतो. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याची दखल घेत पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले आहेत. पाणी साचणाऱ्या ठिकाणांबाबत संयुक्त पाहणी दौरा व संयुक्त बैठकांचे आयोजन पुढील दोन आठवडयात परिमंडळीय उपायुक्तांच्या स्तरावर करून त्यावर आधारित कृती आराखडा बनवण्यास सांगण्यात आले आहे. हा कृती आरखडा महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात होणा-या डिसेंबर महिन्यातील परिमंडळीय उपायुक्तांच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
या वर्षी पावसाळ्यादरम्यान बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण ९८ पाणी साचण्याची ठिकाणे आढळून आली. यापैकी ३७ शहर भागात, ३४ पूर्व उपनगरांमध्ये, तर २७ पश्चिम उपनगरांमध्ये आढळून आली होती. या ९८ ठिकाणी पाणी साचू नये, यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले होते. त्यानुसार सध्या २६ ठिकाणचे काम प्रगतीपथावर आहे. या २६ पैकी ११ ठिकाणे शहर भागात, ६ ठिकाणे पूर्व उपनगरात; तर ९ ठिकाणे ही पश्चिम उपनगरात आहेत. उर्वरित ७२ ठिकाणांपैकी २७ ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया सुरु आहे. या २७ पैकी ७ ठिकाणे शहर भागात, ९ ठिकाणे पूर्व उपनगरात तर ११ ठिकाणे पश्चिम उपनगरात आहेत. उर्वरित सर्व ४५ ठिकाणांबाबत महापालिकेच्या विविध खात्यांचा संयुक्त पाहणी दौरा व संयुक्त बैठका आयोजित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले. विशेष म्हणजे या ४५ ठिकाणांपैकी १२ ठिकाणे ही सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, रेल्वे इत्यादींशी संबंधित आहेत. त्यामुळे संयुक्त पाहणी दौ-यांमध्ये व बैठकांमध्ये त्यांनाही सहभागी करुन घ्यावे असे आदेश बैठकीदरम्यान देण्यात आले. ४५ पैकी शहर भागात व पूर्व उपनगरात प्रत्येकी १९ ठिकाणे असून पश्चिम उपनगरात ७ ठिकाणे आहेत.