मुंबई | प्रतिनिधी - हवामान खात्याकडून अरबी समुद्रात चक्री वादळाची सूचना देण्यात आल्याने 5 व 6 डिसेंबर रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी येणा-या अनुयायींना ‘ओखी’ वादळाचा धोका लक्षात घेता समुद्र किनारी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अरबी समुद्रात आलेल्या ओकी चक्रीवादळाचा परिणाम गुजरात आणि मुंबई दक्षिण किनारपट्टीवर होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई किनारपट्टी पासून तब्बल 690 किमी समुद्रात हा ओकी नावाचे वादळ सुरू झाले आहे. 5 डिसेंबरला मध्यरात्री गुजरात सुरतकडून मुंबईकडे 50 ते 60 प्रति किलो मीटर वेगाने वारे वाहणार असल्याने कोकण किनारपट्टीवर सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी 5 व 6 डिसेंबरला समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नयेत असेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात उत्तरेकडे 6 आणि 7 डिसेंबरला पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 5 व 6 डिसेंबर या कालावधित समुद्रात येणा-या उंच लाटांच्या भरतीमुळे कॅडल रोड आणि शिवाजी पार्क परिसरात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. 6 डिसेंबर रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवशी चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. ओखी वादळाच्या शक्यतेने सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांना समुद्र किनारी जाण्यास मज्जाव करण्यात आला असून, चैत्यभूमीवर आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास अग्निशमन दल, पोलीस, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नौदल, स्थानिक यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र किनारी असणा-या वस्त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याने,चैत्यभूमीवर येणारे जनसमूदाय ज्या ठिकाणी मुक्काम करतात अशा ठिकाणी भरती आणि ओहोटीचे फलक लावण्यात येवून, कोणीही समूद्रात जावू नये म्हणून बॅरीकेटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.