पालिकेच्या नियंत्रण कक्षाचे छत कोसळले - महापौर,आयुक्त थोडक्यात बचावले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2017

पालिकेच्या नियंत्रण कक्षाचे छत कोसळले - महापौर,आयुक्त थोडक्यात बचावले


मुंबई । अजेयकुमार जाधव -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त दादर चैत्यभूमी परिसरात मुंबई महानगरपालिकेकडून सोयी सुविधा पुरण्यात येतात. या सर्व सोयी सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये बनवण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे छत मंगळवारी सकाळी महापौरांकडून माहिती पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर कोसळले. या दुर्घटनेमधून मुंबईचे महापौर, पालिका आयुक्त व इतर पदाधिकारी थोडक्यात बचावले.   

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेकडून पाणी, शौचालय, बाथरूम, आरोग्य इत्यादी सुविधा पुरवण्यात येतात. यासुविधांची माहिती व बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील माहिती पालिकेकडून पुस्तिकेच्या रूपात प्रसिद्ध केली जाते. या पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी शिवाजी पार्क येथील पालिकेच्या नियंत्रण कक्षात करण्यात आले. यावेळी पालिका आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेते यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर, आरोग्य समितीच्या अध्यक्षा रोहिणी कांबळे, महिला व बाळ कल्याण समितीच्या अध्यक्षा सिंधू मसुरकर, अतिरिक्त पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुंबईला ओझी वादळाचा तडाखा बसणार असा इशारा दिला गेला होता. ओझी वादळ मुंबईकडे सरकत असताना मुंबईत सोमवारी संध्यकाळपासून पाऊस पडत होता. पावसाचे पाणी शिवाजी पार्क मधील पालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या मंडपावर साचले होते. महापौर येण्या आधी काही प्रमाणात पाणी काढण्यात आले. महापौर नियंत्रण कक्षात येताच त्यांच्या हस्ते घाईगडबडीत माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तिकेचे प्रकाशन केल्यावर महापौर आणि मान्यवर स्टेजवरून खाली उतरताच पाण्याने भरलेले मंडपाचे छत कोसळले. नियंत्रण कक्षात काही सेकंद महापौर आणि इतर मान्यवर थांबले असते तर त्यांना या दुर्घटनेचा फटका बसला असता. दरम्यान मंडप डेकोरेशनवाल्याकडून योग्य प्रकारे मंडप बांधला नसल्याने मंडपावर पाणी साचून हे छत कोसळल्याचा आरोप केला जात असून याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

Post Bottom Ad