मुंबई । प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबईत दाखल झालेल्या आंबेडकर अनुयायांकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बृहन्मुंबई महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या सेवा सुविधा व कामांचा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका अधिकाऱयांकडून आढावा घेतला.
महापौर विश्वनाथ आंबेडकर अनुयायांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाला दिलेल्या संविधानासोबतच माणसाला माणूस म्हणून जगण्याची जी शिकवण दिली आहे ती शिकवणच खऱया अर्थांने अंमलात आणणे हेच डॉ. आंबेडकरांना अभिवादन ठरेल असेही महापौर म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराने अनुयायांनी चालण्याचा प्रयत्न करावा. बृहन्मुंबई महापालिकेतर्फे याठिकाणी ज्या काही सेवा - सुविधा पुरविण्यात आल्या आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही महापौरांनी यावेळी केले. उपस्थित अनुयायांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस विभागाने केलेल्या सूचनांची दखल घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
यानंतर महापौरांनी महापालिकेतर्फे उभारलेल्या निरिक्षण मनोऱयावरुन परिसराची पाहणी केली. त्यासोबतच समता सैनिक दलाच्या सैनिकांसोबत महापौरांनी परिसराचा फेरफटका मारुन सेवा-सुविधांचा आढावा घेतला तसेच त्यांच्यासोबत चर्चाही केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित आंबेडकरी अनुयायांना भोजनदानाचे वितरण करण्यात आले. या भोजनदान कार्यक्रमास अप्पर पोलिस आयुक्त डी. कनकरत्नम, आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे, माजी नगरसेवक शरद कांबळे, समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कसबे, उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे, पदाधिकारी रवि गरुड, सुरेंद्र चिखलकर आणि रमेश जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.