मुंबई | प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱयांनी सामाजिक कर्तव्याच्या भूमिकेतून विचार करुन दिव्यांग व्यक्तींच्या समस्या तातडीने निकाली काढाव्यात असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.
बृहन्मुंबईतील दिव्यांगाच्या समस्यांबाबत महापालिका अधिकारी व दिव्यांगासाठी काम करणाऱया संघटना यांची संयुक्त बैठक महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुढेकर, माजी महापौर तथा नगरसेविका स्नेहल आंबेकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड, उप आयुक्त (शिक्षण) मिलीन सावंत, दिव्यांग संस्थेचे सुर्यकांत लाडे, सहाय्यक आयुक्त (नियोजन) डॉ. संगिता हसनाळे व संबधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दिव्यांगाच्या समस्येबाबत सविस्तर निवेदन केले.यामध्ये दिव्यांगाचे बुथ यांना फेरीवाला नियम लागू न करता त्यांना ‘फेरीवाला’ संज्ञेतून वगळावे तसेच त्यांचे बूथ तोडण्याची कार्यवाही थांबवावी अशी मागणी केली. हा विषय नगरपथ विक्रेता समितीच्या प्रथम बैठकीत अग्रक्रमाने मांडण्यात येणार असल्याचे संबधित अधिकाऱयांनी सांगितले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांगाना इतर वस्तु विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली असता, हा विषयसुध्दा या बैठकीतच अग्रक्रमाने मांडणार असल्याचे संबधित अधिकाऱयांनी सांगितले. त्यासोबतच दिव्यांगाच्या मृत्युनंतर त्याचा वारसदार नसेल तर त्याचा स्टॉल हा संबधित परिसरातील दिव्यांगांनाच देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली असता यावेळी सकारात्मकतेने हा निर्णय घेणार असल्याचे महापालिका अधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिव्यांगाच्या समस्येबाबत तातडीने निर्णय घेण्याची सूचना संबधित महापालिका अधिकाऱयांना करुन येत्या ७ डिसेंबरला त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याचे महापौरांनी शेवटी सांगितले.