मुंबई । अजेयकुमार जाधव -
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबरला ६१ वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून २५ लाखांहून अधिक आंबेडकरी अनुयायी दादर चैत्यभूमी येथे येतात. देशभरातून आलेल्या लाखो भीम अनुयायांना दादर शिवाजी पार्क, चैत्यभूमी, राजगृह, हिंदू कॉलनी, दादर रेल्वे स्थानक, एलटीटी स्थानक, डॉ. आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) आदी ठिकाणी विविध नागरी सुविधा देण्यास मुंबई महापालिका सज्ज झाली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर येणार्या अनुयायांमध्ये लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. त्यांना शिस्तीने अभिवादन करता यावे व त्यांच्या निवासाची, खाण्या-पिण्याची आणि विश्रांतीची सेवा-सुविधाही महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आली आहे. भारत स्काऊट गाईड हॉल येथे भिक्कूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरात १ लाख २५ हजार चौरस फूट मंडपाची व्यवस्था, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी उभ्या असणाऱया अनुयायांसाठी उन्हापासूनच्या संरक्षणासाठी छत, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अभिवादनाच्या रांगेमधील अनुयायांना बसण्यासाठी बाकड्यांची सोय केली जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शिवाजी पार्क मैदानात ४६९ स्टॉल्सची रचना, पिण्याच्या पाण्याच्या ३२० नळांची व्यवस्था, १५ टँकर्स, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात फ्लेक्स बॅनर्स, होर्डिंग्ज व दिशादर्शक फलक, १४ हजार चौ. मी. वर धूळप्रतिबंधक आच्छादक, २६० न्हाणीघरांमध्ये शॉवरची व्यवस्था, बसण्यासाठी ५० बाकडे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्युत व्यवस्था (३५० टयुबलाईटस्, २३० हॅलोजन, ५० पेडेस्टंट फॅन), १०० डिलक्स व ३५० प्लास्टीक खुर्च्या, ३०० लाकडी मेज (टेबल), ध्वनिक्षेपण व्यवस्था, ३०० चार्जिंग पॉईंटस् उपलब्ध केले आहेत. २६० फिरती शौचालये, २६० स्नानगृहे उभारण्यात आली असून विविध ठिकाणी फिरती शौचालये, रांगेत उभे असणाऱया अनुयायांसाठी फिरती शौचालये उपलब्ध करून दिली आहेत.
स्वच्छतेसाठी १५३५ कर्मचारी तैनात -
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी शिवाजी पार्क परिसरात येतात यामुळे स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेद्वारे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येक ५० मीटर अंतरावर कचराकुंडी ठेवण्यात येत आहे. स्वच्छतेच्या अनुषंगाने १५३५ कर्मचाऱयांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कर्मचारी चार पाळ्यांमध्ये काम पाहणार आहेत. कर्मचाऱयांवर ताण पडू नये यांसाठी सफाई कर्मचाऱयांची कामाची वेळ आठ तासांवरुन सहा तास करण्यात आली आहे.
आरोग्य विभाग व अग्निशमन दल सज्ज -
आरोग्य विभाग व अग्निशमन दल सज्ज -
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या लाखोंच्या संख्येने आलेल्या भीम अनुयायांना सुरक्षा पुरवता यावी म्हणून शिवाजी पार्क, दादर स्थानक, चैत्यभूमी परिसरात ७ माहिती कक्ष व निरीक्षण मनोरे, ११ रुग्णवाहिकेसहीत सुसज्ज आरोग्य सेवा, अनुयायांसाठी ६० क्लोज सर्कीट टीव्ही, फिरते कॅमेरे, दूरचित्रवाहिनी, ४४ मेटल डिटेक्टर, ८ बॅग स्कॅनर्स, ६० हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टर, २ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका, समुद्रकिनारी ४ बोटी व जलसुरक्षा इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.