मुंबई । प्रतिनिधी - पालिका रुग्णालयांची दुरावस्था, डॉक्टर- कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, अपुरी यंत्रणा, पायाभूत सुविधांचा अभाव आदी समस्यांची नेहमीच बोंब मारली जाते. मात्र पालिकेच्या माँ रुग्णालयातील प्रकार धक्कादायकच आहे. येथे डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने आणि आहेत ते डॉक्टर रुग्णालयातच राहावे यासाठी राज्य सरकारच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला नियमित पाचारण करावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. प्रशासनाने ही याबाबत कबुली दिली आहे. यामुळे 'राज्य सरकारच्या व्हेंटिलेटरवर पालिकेचे रुग्णालय', असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चेंबूर येथे मुंबई महानगर पालिकेचे माँ रुग्णालय आहे. गरीब व दुर्बल घटकांतील रुग्णाच्या खिशाला परवडणारे रुग्णालय असल्याने येथील स्थानिक रुग्णांनी हे रुग्णालय नेहमीच गजबजलेले असते. मात्र उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नशिबी यातना सहन कराव्या लागतात. गेल्या कित्येक वर्षांपासून येथे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. एक्स रे मशीन, एमआरआय, सिटीस्कॅन, लॅब, औषध विभाग येथे नावालाच आहेत. विशेष म्हणजे येथे अपघात विभागाच देण्यास रुग्णालय प्रशासनाला विसर पडला आहे. तसेच व्हेंटीलेटरची ही सुविधाच नाही, असे येथील रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
डॉक्टरांची अनेक पद रिक्त असल्याने रात्रीच्या वेळी रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असतो. अशावेळी एखादा गंभीर स्वरूपाचा रुग्ण उपचारासाठी आल्यास त्याला इतर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्ण दगावतात. त्यामुळे डॉक्टरांची संख्या लक्षात घेता पालिकेने यावर जालीम उपाय शोधला असून राज्य सरकारच्या हेल्पलाईन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध राहतात व रुग्णाला तात्काळ उपचार ही मिळत आहेत. दरम्यान, रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत तक्रारी येत असतात. यामुळे रुग्णांना होणारी गैरसोय दूर करून तात्काळ उपचार कसे मिळतील, याबाबत पालिका अतिरिक्त आयुक्त आय ए कुंदन यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी सांगितले.
तरच १०८ ची मदत -हे ७४ खाटांचे छोटे रुग्णालय आहे. यामुके रात्रीच्या वेळी एक डॉक्टर कार्यरत असतो. डॉक्टरांची येथे रिक्त पदे नाहीत. मात्र अपघात विभाग नसल्याने गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर तात्काळ उपचार करता येत नाहीत. अशा रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज निर्माण होते. यामुळे १०८ ची मदत घेतली जाते.
- अलका माने प्रमुख वैद्यकीय अधिकारी, माँ रुग्णालय