पालिका शाळांच्या मैदानाचा विकास होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 December 2017

पालिका शाळांच्या मैदानाचा विकास होणार


मुंबई | प्रतिनिधी - 
मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधील मुलांना मैदानी खेळांसाठी मैदाने उपलब्ध नाहीत. काहीं मैदानांची अवस्था फारच दयनीय झाली आहे. अशा मैदानांचा विकास करण्याचा धोरणात्मक निर्णय पालिकेने घेतला आहे. हा निर्णय सर्वच शाळा व खासगी संस्थांना बंधनकारक राहील, असे स्पष्टीकरण प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीत दिले.

मुंबई खेळाच्या मैदानांची वानवा आहे. शालेय मुलांना मैदाने उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने मैदानांचा विकास करण्याचे निश्चित केले आहे. आर दक्षिण, पी उत्तर, एच पूर्व विभागातील ७ शाळांतील मैदानांचा विकास केला जाणार आहे. प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आणला होता. खोखो, कबड्डी, हॅडबॉल, बास्केट बॉल आदी क्रिडा प्रकारांचा यात समावेश आहे. या खेळांबरोबरच मुलांना क्रिकेट खेळता येईल, अशा स्वरुपाचे मैदान पालिकेने तयार करावे. तसेच ज्या संस्थांकडे खेळाची मैदाने आहेत, त्यांनाच पालिकेच्या शाळा देण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली. तर काही मैदानांत रात्रीच्या वेळी वीज पुरवठा नसतो. अनेक मैदाने बकाल झाली आहेत. काहीं खासगी शालेय संस्थांच्या ताब्यात ठेवली आहेत. यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळता येत नाहीत. त्यामुळे पालिकेने अशी मैदाने सर्वप्रथम हस्तांतरीत करुन त्यांचा विकास करावा आणि मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन द्यावित, यासाठी प्रशासनाने नवे धोरण तयार करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. दरम्यान, मुलांना खेळाचे गणवेश दिले जात आहेत. सध्या ७ शालेय मैदानांचा विकास होत आहे. मात्र, मुंबईतील प्रत्येक शाळांनी मैदानांचा विकास करणे बंधनकराक आहे, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त आय.ए.कुंदन यांनी दिले.

Post Bottom Ad